Join us  

Birth Anniversary : शम्मी कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला केले होते प्रपोज, नकारानंतर घेतली होती ‘ही’ शपथ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 9:00 AM

आजही शम्मी कपूर हे नाव घेतले की आठवते ते, चाहे कोई मुझे जंगली कहे... अशी आरोळी ठोकणारा, फ्रि स्टाईल डान्स करणारा, प्लेबॉय अशी इमेज असलेला एक बिनधास्त, बेभान अभिनेता.

भुरे डोळे, कपाळावर रूळणारे केस, देखणा चेहरा म्हणजे शम्मी कपूर. आजहीशम्मी कपूर हे नाव घेतले की आठवते ते, चाहे कोई मुझे जंगली कहे... अशी आरोळी ठोकणारा, फ्रि स्टाईल डान्स करणारा, प्लेबॉय अशी इमेज असलेला एक बिनधास्त, बेभान अभिनेता. पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांपैकी शम्मी हे त्यांचे दुसरे अपत्य. आज(२१ आॅक्टोबर) शम्मी कपूर यांचा वाढदिवस.  त्यांच्या वागण्या-बोलण्याची विशिष्ट ढब, नाच करतानाची अजब शैली यासारख्या गोष्टींमुळे शम्मी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले होते. शम्मी कपूर यांना कधीच कोरिओग्राफरची गरज पडली नाही. ते स्वत:चे स्टेप्स स्वत: बसवत. त्यांच्या डान्सच्या अजब शैलीमुळे त्यांना डान्सिंग हिरो म्हणून ओळखले जात असे.

शम्मी कपूर यांचे खरे नाव शमशेर राज कपूर असे होते. शम्मी कपूर यांनी अभिनेत्री गीता बालीसोबत लव्ह मॅरेज केले होते. त्यांचे वडिल पृथ्वीराज कपूर यांचा या लग्नाला प्रचंड विरोध होता. गीता बालीचे कुटुंबही या लग्नाच्या विरोधात होते. दोन्ही कुटुंबाच्या विरोधामुळे दोघांनीही मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात या लग्नानंतर दोन्ही कुटुंबांनी लग्नाला संमती दिली. पण लग्नानंतर उण्यापु-या दहा वर्षांत गीता बाली यांचे निधन झाले. पत्नीच्या निधनामुळे शम्मी कपूर कोलमडून गेले होते.   शम्मी गीता यांची दोन्ही मुले लहान होती. त्यामुळे कपूर कुटुंबाकडून शम्मी यांच्यावर दुस-या लग्नासाठी दबाव वाढला. पण शम्मी कपूर तयार होईनात.

 याचदरम्यान ते अभिनेत्री मुमताजसोबत ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाचे शूटींग करत होते. या चित्रपटाच्या सेटवर मुमताज आणि शम्मी यांच्यात जवळीक वाढली. सगळीकडे या अफेअरची चर्चा रंगली. अखेर शम्मी यांनी मुमताज यांना प्रपोज केले. त्यावेळी मुमताज १८ वर्षांची तर शम्मी तिच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. मुमताजने नुकतीच करिअरला सुरूवात केली होती आणि तिला बराच मोठा पल्ला गाठायचा होता.  पण कपूर घराण्याच्या परंपरेनुसार, त्याकाळात स्त्रियांना अभिनय करण्यास मनाई होती. लग्नानंतर अभिनय सोडावा लागेल, ही शम्मी कपूर यांची अट मुमताजला मान्य नव्हती. त्यामुळे मुमताजने शम्मी यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. हा नकार शम्मी कपूर यांना इतका लागला की, आता कुण्याच अभिनेत्रीशी लग्न करणार नाही, असे त्यांनी ठरवले आणि यानंतर  भावनगरच्या रॉयल फॅमिलीतील नीला देवी यांच्यासोबत दुसरे लग्न केले.

पण लग्नाच्या वेळी त्यांनी नीला यांच्यासमोर अट ठेवली की, त्या कधीही आई होऊ शकणार नाहीत. गीता यांच्या मुलांनाच त्यांना स्वत:ची मुले मानावी लागतील. नीला देवी यांनी शम्मी यांची अट मान्य केली आणि आयुष्यभर स्वत:चे बाळ होऊ दिले नाही. नीला यांनी गीता यांच्या मुलांचे स्वत:च्या मुलांप्रमाणे पालनपोषण केले.

टॅग्स :शम्मी कपूरमुमताज