Join us  

आर. डी. बर्मन यांच्यावरही बनणार चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 3:18 PM

होय, आर डी बर्मन यांचे आयुष्य बायोपिकरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देवयाच्या नवव्या वर्षी पंचम दा यांनी त्यांचे पहिले गाणे संगीतबद्ध केले होते.

पंचम दा या नावाने ओळखले जाणारे राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन यांच्या गाण्यांची त-हा न्यारीच. संगीतात नव-नवीन प्रयोग करणारे संगीतकार अशी पंचम दा यांची ओळख होती. हिंदी चित्रपटसृष्टीत ब्राझिलचे बोस्सा नोव्हा रिदम वापरणारेही ते पहिलेच. पंचमदांच्या स्वरस्पर्शाने ,संगीतसाजाने अजरामर झालेली अनेक गाणी आजही श्रोत्यांच्या कानात रूंजी घालतात. हेच पंचम दा आता चित्रपटरूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. होय, आर डी बर्मन यांचे आयुष्य बायोपिकरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.ताजी बातमी खरी मानाल तर बंगाली चित्रपटांचे सुपरस्टार प्रोसेनजीत चॅटर्जी यांनी आर. डी. बर्मन यांच्यावर बायोपिक बनण्याचा निर्णय घेतला आहे. आकाश गुप्ता आणि अरून्वा जॉय सेनगुप्ता यांच्यासोबत मिळून त्यांनी या बायोपिकसाठीचे हक्क  खरेदी केले आहेत.२०१५ मध्ये आर. डी. बर्मन यांचे ‘आर. डी. बर्मन- प्रिन्स आॅफ म्युझिक’ हे जीवनचरित्र प्रकाशित झाले होते. खगेश देव लिखित या पुस्तकात आर. डी. बर्मन यांच्या खासगी आयुष्याशिवाय त्यांचे बॉलिवूडमधील योगदान याबद्दल सविस्तर लिहिण्यात आले आहे. त्याचे बायोपिक याच पुस्तकावर आधारित असणार आहे.

या बायोपिकमध्ये आर. डी. बर्मन यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय बंगालीसह अन्य कुठल्या भाषेत हे बायोपिक प्रदर्शित होणार, हेही गुलदस्त्यात आहे. पण पुढील वर्षांपर्यंत पंचम दा यांचे बायोपिक मोठ्या पडद्यावर येईल, अशी शक्यता आहे. 

वयाच्या नवव्या वर्षी पंचम दा यांनी त्यांचे पहिले गाणे संगीतबद्ध केले होते.  १९५६ साली प्रदर्शित ‘फंटूश’ या चित्रपटात या गाण्याचा वापर करण्यात आला होता. पंचमदांचे वडील एस. डी. बर्मन हे देखील प्रसिद्ध संगीतकार होते. एस. डी. बर्मन यांच्या  मेरे सपनों की रानी कब आएगी तू, सिर जो तेरा चकराए , कोरा कागज था ये मन मेरा  या गाण्यांमध्ये पंचम दांचादेखील सहभाग होता.

टॅग्स :आर डी बर्मन