Join us  

'बधाई हो' सिनेमाला दोन वर्षे पूर्ण, आयुष्मान खुरानाने पहिल्यांदाच सांगितल्या 'या' गोष्टी, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 4:09 PM

'विकी डोनर' या माझ्या पहिल्या सिनेमापासूनच समाजात काही बदल व्हावेत यासाठी ठोस चर्चेला आमंत्रण देण्यात मी थोडा का होईना वाटा उचलतोय, हे तुमच्या लक्षात येईल," असे आयुष्यमान म्हणाला. 

समाजात निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयांवर सामान्य रितीने चर्चा सुरू व्हावी असा प्रयत्न माझ्या सिनेमांमधून केला जातो, सांगतोय आयुष्यमान खुराना, 'बधाई हो' या ब्लॉकब्लस्टर सिनेमाला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने तो बोलत होता.

बॉलिवुडस्टार आयुष्यमान खुराना हा विचारप्रवर्तक अभिनेता समजला जातो. सिनेमांच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवत असल्याबद्दल टाईम मॅगझिनने जगातील सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्तींमध्ये आयुष्यमानच्या नावाचा समावेश केला आहे.

दोन मोठी मूले असलेल्या ज्येष्ठ जोडप्याच्या अनपेक्षित गरोदरपणाच्या कथेवर आधारीत ब्लॉकब्लस्टर 'बधाई हो' या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आयुष्यमान अशा प्रकारचे सिनेमे निवडण्याविषयी बोलला.

"माझ्या सिनेमातून निषिद्ध मानल्या गेलेल्या विषयांबद्दलच्या संवादाला सामान्य रूप देण्याचा प्रयत्न मी करत असतो. 'विकी डोनर' या माझ्या पहिल्या सिनेमापासूनच समाजात काही बदल व्हावेत यासाठी ठोस चर्चेला आमंत्रण देण्यात मी थोडा का होईना वाटा उचलतोय, हे तुमच्या लक्षात येईल," असे आयुष्यमान म्हणाला. 

तो पुढे म्हणाला, "आजवर जे अत्यंत महत्त्वाचे विषय दुर्लक्षित राहिले आहेत त्यांच्याकडे व्यापक दृष्टिकोनातून बघा हे आपण सिनेमाच्या माध्यमातून समाजाला सांगू शकतो, असे माझे ठाम मत आहे. आपल्या देशात लाजाळूपणा फार होता आणि आताही आहे. ते काहीवेळेला छानही असतं. पण, माझ्या देशातील लोकांनी माझ्या पद्धतीच्या सिनेमांचं कसं कौतुक केलं, हे पाहिलं की आनंद होतो."

आयुष्यमानने सलग आठ हिट सिनेमे दिलेत. त्याच्या पुरोगामी, काळाच्या पुढे असणाऱ्या सामाजिक मनोरंजनपर सिनेमांना मिळणारे प्रेक्षकांचे प्रेम फार प्रोत्साहनपर आहे, असे तो सांगतो. आपल्या पालकांमधील शारीरिक प्रेमाकडे चुकीच्या नजरेने पाहू नये, हे बधाई हो च्या माध्यमातून सांगितले गेले, असे तो म्हणतो.

"आजवर समोर न येऊ शकलेल्या विषयांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज समाजालाही वाटते, हे प्रेक्षकांच्या प्रेमातून सिद्ध होते आणि एक कलाकार म्हणून माझ्यासाठी ही फार मोठी यशाची पावती आहे. 'बधाई हो'मधून मी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की आपल्या पालकांमध्येही लैंगिक इच्छा असू शकतील आणि ते चूक नाही. बॉलिवुडसाठी ही पटकथा दुर्मिळ होती पण आवश्यक होती," असे तो म्हणाला.

टॅग्स :आयुषमान खुराणाबधाई हो