Join us  

बॅकग्राउंड डान्सर ते बॉलिवूडचा धोनी असा होता सुशांत सिंग राजपूतच्या करियरचा यशस्वी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 4:12 PM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतला 2016 साली रिलीज झालेला बायोपिक एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरीमधून बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची भूमिका साकारली होती आणि त्याच्या या भूमिकेचं खूप कौतूकही झाले होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे बॉलिवू़ड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना धक्का बसला आहे. सुशांतने त्याच्या करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली होती. त्यानंतर त्याला रुपेरी पडद्यावर खरी ओळख एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून मिळाली.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील कारकीर्द -

सुशांत सिंग राजपूतने त्याच्या करियरची सुरूवात बॅकग्राउंड डान्सरपासून केल्याचं फार कमी लोकांना माहित आहे. त्याने 2008 साली स्टार प्लस वाहिनीवरील मालिका किस देश में है मेरा दिलमधून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले. 2010 साली तो टेलिव्हिजनवरील रिएलिटी शो जरा नचके दिखामध्ये झळकला होता. त्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खरी ओळख मिळाली ती एकता कपूरची मालिका पवित्र रिश्तामधून. या मालिकेतील भूमिकेतून तो घराघरात पोहचला.

बॉलिवूडमधील त्याचा प्रवास

छोट्या पडद्यावर यशस्वी वाटचाल केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडकडे वळला. 2013 साली त्याने काय पोछे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याच सालात त्याचा आणखीन एक सिनेमा रिलीज झाला. हा चित्रपट म्हणजे शुद्ध देसी रोमांस. 2014 साली तो आमीर खानचा सुपरहिट सिनेमा पीकेमध्ये अनुष्का शर्माच्या प्रियकराच्या भूमिकेत झळकला होता. 2015 साली सुशांत डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. सुशांतला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली 2016 साली रिलीज झालेला बायोपिक एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी सिनेमातून. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत या चित्रपटात सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती आणि या चित्रपटातील सुशांतच्या कामाचे खूप कौतूक झाले होते. त्यानंतर त्याने राबता, वेलकम टू न्यूयॉर्क, केदारनाथ, सोनचिडिया व छिछोरे या सिनेमात काम केले होते.

डिजिटल माध्यमात केलेली ड्राइव्ह

सुशांत सिंग राजपूतने डिजिटल माध्यमातही पदार्पण केले होते. त्याचा ड्राइव्ह हा वेबफिल्मदेखील काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या फिल्मला हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत होती.

सुशांतचे करियर ग्राफ यशाच्या शिखराकडे वाटचाव करणारा होता. आतापर्यंतच्या त्याच्या करियरमध्ये त्याला बरेच पुरस्कारही मिळाले होते. त्याला इंडियन टेलिव्हिडन अॅकाडमीचा पुरस्कार, बिग स्टार एण्टरटेन्मेंट अवॉर्ड, कलाकार अवॉर्ड आणि स्क्रीन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत