Join us  

Birthday Special: ‘या’ व्यक्तिमुळे आशा पारेख आयुष्यभर राहिल्या अविवाहित! कधी काळी केला होता आत्महत्येचाही विचार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 9:25 AM

अभिनेत्री आशा पारेख यांचा आज (२ आॅक्टोबर) वाढदिवस. गुजरातच्या महुआ येथे मध्यवर्गीय गुजराती कुटुंबात आशा पारेख यांचा जन्म झाला. दहा वर्षांच्या वयात त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली.

 अभिनेत्री आशा पारेख यांचा आज (२ आॅक्टोबर) वाढदिवस. गुजरातच्या महुआ येथे मध्यवर्गीय गुजराती कुटुंबात आशा पारेख यांचा जन्म झाला. दहा वर्षांच्या वयात त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली.आशा पारेख यांना लहानपणापासून अभिनयची आवड होती. शाळेत असताना त्या प्रत्येक मित्र व शिक्षकांची नक्कल करायच्या. १९५२ मध्ये आलेल्या ‘माँ’ या चित्रपटानंतर अनेक चित्रपटात त्या बालकलाकार म्हणून दिसल्या.  पण पुढे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी अ‍ॅक्टिंग सोडली. अर्थात त्या फार काळ अभिनयापासून दूर राहू शकल्या नाहीच. सोळाव्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. अर्थात हा निर्णय इतका सोपा नव्हता.

विजय भट्ट यांच्या ‘गुंज उठी शहनाई’ या चित्रपटाच्या आॅडिशनसाठी आशा पारेख पोहोचल्या. पण विजय भट्ट यांनी त्यांना नकार दिला. विजय भट्ट यांच्या मते, आशा पारेख यांच्यात कुठलेही स्टार मटेरियल नव्हते. अर्थात या रिजेक्शनच्या आठव्या दिवशीच प्रोड्यूसर सुबोध मुखर्जी व राइटर- डायरेक्टर नासीर हुसैन यांनी ‘दिल देके देखो’साठी त्यांना साईन केले. यात शम्मी कपूरसोबत आशा यांची वर्णी लागली. हा चित्रपट हिट झाला अन् आशा पारेख रातोरात स्टार झाल्यात. यानंतर नासीर हुसैन यांनी आशा यांना आपल्या सहा चित्रपटांसाठी साईन केले होते. ‘जब प्यार किसी से होता है’,‘फिर वो ही दिल लाया हंू’,‘तिसरी मंजिल’,‘बहारों के सपने’,‘प्यार का मौसम’,‘कारवां’ असे हे सहाही चित्रपट हिट ठरले होते.
आशा पारेख आजही अविवाहित आहेत. मात्र त्यांच्या आणि आमिर खानचे काका नासीर हुसैन यांच्या प्रेमाच्या चर्चा बºयाच रंगल्या होत्या. आशा यांनी एका मुलाखतीत स्वत: याची कबुली दिली होती. नासीर साहब एकमेव असे व्यक्ती होते, ज्यांच्यावर मी जिवापाड प्रेम केले. पण त्यांचा संसार तोडणे मला मान्य नव्हते. त्यांच्या कुटुंबात आणि माझ्यात कुठलाच वाद नव्हता. मला त्यांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळे करायचे नव्हते आणि याच भीतीमुळे मी लग्न केले नाही. माझ्या आईने माझ्या लग्नासाठी बरेच प्रयत्न केले. पण कदाचित नियतीला हे मान्य नव्हते. मनासारखा जोडीदार मिळाल्यावर लग्न करू, असा विचारही मी करून पाहिला. पण असे कुणीच मिळाले नाही, असे आशा पारेख यांनी या मुलाखतीत सांगतले होते.
१९७६ पर्यंत आशा पारेख लीड अ‍ॅक्ट्रेसच्या भूमिकेत दिसल्या. यानंतर त्यांना लीड अ‍ॅक्ट्रेसच्या भूमिका मिळणे बंद झाले. यानंतर त्या काही चित्रपटात सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेसच्या भूमिकेत दिसल्या. १९९५ मध्ये त्यांनी अभिनयाला रामराम केला. त्यांनी एक प्रॉडक्शन कंपनी बनवली. याअंतर्गत त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती केली.
 आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आशा पारेख एकट्या पडल्या होत्या. यादरम्यान त्यांच्या मनात आत्महत्येचे विचारही येऊन गेलेत. एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितले होते. एकाकीपणाच्या त्या काळात मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मी आत्महत्येचा विचारही केला होता. पण यानंतर मी डिप्रेशनवर उपचार केलेत आणि यातून बाहेर पडले. आशा पारेख यांचे आत्मचरित्र ‘द हिट गर्ल’ अलीकडेच प्रकाशित झाले. हे आत्मचरित्र त्यांनी खालिद मोहम्मद यांच्यासोबत मिळून लिहिले आहे. 

टॅग्स :आशा पारेख