Join us  

आशा भोसले यांनी सगळ्यांना केले १०० रुपये मदत करण्याचे आवाहन, या आवाहानाचे होतंय सगळीकडे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 6:43 PM

आशा भोसले यांनी देशातील सगळ्या लोकांना पंतप्रधान निधीत मदत करण्याविषयी आवाहन केले आहे.

ठळक मुद्देआशा भोसले यांनी सांगितले आहे की, आपण सगळ्यांनी प्रत्येकी १०० रुपये पंतप्रधान निधीत मदत केली तर आपण देशातील १३० कोटी लोक मिळून १३००० कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यक निधीत जमा करू शकतो.

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात करोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. 

या कोरोना संकटाशी लढण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने आर्थिक मदत करत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी पुढे येत पंतप्रधान सहाय्यक निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीत मदत केली आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे अनेकांना दोन वेळेचे जेवण देखील मिळत नाहीये. काही कलाकार या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत तर काही जण लोकांना आर्थिक मदत करत आहेत. या सगळ्यात आता ज्येष्ठ अभिनेत्री आशा भोसले यांनी एक खूपच चांगले आवाहन लोकांना केले आहे.

आशा भोसले यांनी देशातील सगळ्या लोकांना पंतप्रधान निधीत मदत करण्याविषयी आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले आहे की, आपण सगळ्यांनी प्रत्येकी १०० रुपये पंतप्रधान निधीत मदत केली तर आपण देशातील १३० कोटी लोक मिळून १३००० कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यक निधीत जमा करू शकतो. एखाद्याला १०० रुपयांपेक्षा अधिक मदत करण्याची इच्छा असल्यास त्याने त्यापेक्षा अधिक पैशांची मदत करावी. अशा पद्धतीने कोरोना विरोधात लढण्यासाठी एक चांगली रक्कम जमा होऊ शकते. त्याचसोबत त्यांनी आओ बच्चो तुम्हे दिखाएं झाँकी हिंदुस्तान की हे प्रोत्साहनपर गाणे देशातील लोकांसाठी गायले आहे. हे गाणे कोरोनाच्या लढाईत लोकांचे प्रोत्साहन वाढवण्यास कामी येईल यात काहीच शंका नाही. 

टॅग्स :आशा भोसलेकोरोना वायरस बातम्या