Join us

​‘बेफिक्रे’साठी आली वुडी अ‍ॅलनची आर्ट डिरेक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 13:13 IST

रोमॅण्टिक चित्रपट काढण्यात ‘यशराज’ कॅम्पचा हात कोणीच धरू शकत नाही. यशजींपासून ते आदित्यपर्यंत ही परंपरा कायम आहे. प्रेमाची व्याख्या ...

रोमॅण्टिक चित्रपट काढण्यात ‘यशराज’ कॅम्पचा हात कोणीच धरू शकत नाही. यशजींपासून ते आदित्यपर्यंत ही परंपरा कायम आहे. प्रेमाची व्याख्या नव्याने लिहिण्याचा प्रयत्न तो आगामी ‘बेफिक्रे’ सिनेमातून करू पाहतोय. त्यासाठी त्याने हॉलीवूडची मदत घेतली आहे.प्रसिद्ध अभिनेते-लेखक-दिग्दर्शक वुडी अ‍ॅलन यांच्या सिनेमांसाठी सेट तयार करणारी आर्ट डिरेक्टर अ‍ॅने सिबेल ‘बेफिक्रे’च्या निमित्ताने प्रथमच बॉलीवूड चित्रपटासाठी काम करीत आहे. अ‍ॅलनच्या आॅस्कर प्राप्त ‘मिडनाईट इन पॅरिस’मध्ये तिने विसाव्या दशकातील पॅरिस उभारले होते. अ‍ॅनेच्या मते, आदित्य चोपडाने तिला पॅरिसकडे एका नव्या चष्म्यातून पाहायला लावले.ती म्हणते, सुरुवातीलाच त्याने मला नेहमीपेक्षा काही तरी हटके करण्याचे स्पष्ट केले. उदाहरण म्हणून ‘व्हेन हॅरी मेटी सॅली’ (१९८९) आणि ‘बाऊट दी सुफल’ (१९६०) या चित्रपटांचे संदर्भ दिले. त्याला काय पाहिजे याची पूर्ण जाणीव आहे. त्याच्या डोक्यात पूर्ण सिनेमा तयार होता. अशा दिग्दर्शकांसोबत काम करताना खरंच खूप छान वाटते.वुडी अ‍ॅलन, अ‍ॅने सिबेल आणि आदित्य चोपडावुडी अ‍ॅलन आणि क्लिंट इस्टवूडसारख्या लेजेंडरी दिग्दर्शकांबरोबर काम केल्यानंतर आदित्यसोबत काम करणे अवघड गेले का यावर ते म्हणते, तो सर्वांचे म्हणने ऐकून घेतो. तसा तो फ्लेक्सिबल आहे मात्र, अनेकदा तो कडक शिक्षकाची भूमिकेत जातो. कामाचे पॅशन एवढे की, सगळ्यांनीच बेस्ट देण्याची त्याची इच्छा असते. आणि दिग्दर्शकाने तसे असावेसुद्धा. बॉलीवूड फिल्मचा अनुभव फार छान होता, अशी ती सांगते. ‘ मी अनेक हॉलीवूड सिनेमांसाठी पॅरिसची उभारणी केलेली आहे. स्पीलबर्गच्या ‘म्युनिच’साठी बुडापेस्टमध्ये पॅरिसचा सेट उभारला तर ‘जीआयजो’साठी प्रागमध्ये. ‘बेफिक्रे’चा रोमान्स एकदम फ्रेश असल्यामुळे माझ्यासाठी पॅरिसला त्यानुसार दाखवण्याचे मोठे आव्हान होते. प्रसिद्ध लोकेशन्सवरती डान्स चित्रिकरण करण्याचा एक्सपेरियन्स भन्नाट होता.या चित्रपटामुळे पॅरिसकडे ती नव्या नजरेने पाहू लागली. तिने यापूर्वी बॉलीवूडसाठी काम जरी केलेले नसले तरी तिने अनेक हिंदी चित्रपट पाहिलेले आहेत. ती म्हणते, ‘मला हिंदी चित्रपट पाहायला आवडतात. ‘बेफिक्रे’च्या सेटवर वातावरण फॅमिलीसारखे होते. मौजमजा आणि भारतीय मसालेदार पदार्थांची चव चाखत आम्ही काम केले.’पॅरिसमधील आयफेल टॉवर, माँटमार्टे, नॉट्रे डेम, बट्स शॉमाँट यासारख्या जगप्रसिद्ध लोकेशन्सवर या रणवीर सिंग-वाणी कपूर स्टारर सिनेमाची शूटींग करण्यात आली आहे. आतापर्यंत अगणिक वेळा पॅरिस रुपेरी पडद्यावर दाखविण्यात आले आहे; परंतु आदित्यने फ्रेश दृष्टीकोनातून शहराचा एका पात्र म्हणून उपयोग केल्याचे अ‍ॅने सांगते.