Join us  

​कुछ भिगे अल्फाज चित्रपटात दिसणार आर्ची

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 10:51 AM

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला सैराट हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. या चित्रपटातील आर्ची आणि परशा या दोन्ही ...

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला सैराट हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. या चित्रपटातील आर्ची आणि परशा या दोन्ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी प्रेक्षकांनी त्या दोघांना डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील आर्चीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. हा चित्रपट बॉलिवूडच्या सेलिब्रेटींना देखील तितकाच आवडला होता. या चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेप्रमाणे एक भूमिका प्रेक्षकांना आता एका हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.ओनिरचे आजवरचे अनेक चित्रपट गाजले आहेत. त्याचे चित्रपट नेहमीच वेगळ्या विषयांवरचे असतात. त्यांच्या कलाकृती समाजात बऱ्याचदा वाद आणि प्रश्न निर्माण करतात. त्यांचे चित्रपट खऱ्या जीवनावर आणि कटू सत्यावर आधारीत असतात. कुछ भिगे अल्फाज या त्यांच्या आगामी चित्रपटात देखील ते आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळे घेऊन येणार आहेत. ओनिर यांचा कुछ भिगे अल्फाज हा पहिला रोमॅंटिक चित्रपट तंत्रज्ञानाच्या युगातली एक आधुनिक भावूक प्रेमकथा आहे. या चित्रपटात आरजे अल्फाजची भूमिका नवोदित कलाकार झैन खान दुरानी आणि आर्ची ही भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री गीतांजली थापाने साकारली आहे.कुछ भिगे अल्फाज या चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेवर ओनिरने प्रचंड मेहनत घेतली आहे. ही भूमिका खरी खुरी वाटावी यासाठी त्याने प्रयत्न केला आहे. सैराट या चित्रपटात आर्चीची भूमिका रिंकू राजगुरूने साकारली होती. सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ओनिरचे जवळचे मित्र आहेत. जेव्हा ओनिरने सैराट पाहिला, तेव्हा आर्चीची भूमिका त्याला प्रचंड आवडली. कुछ भिगे अल्फाज साकारताना ओनिरने आर्चीच्या भूमिकेला स्मरणात ठेवले होते. गीतांजलीची भूमिका  सैराट मधल्या रिंकू राजगुरू सारखी आनंदी, स्वच्छंदी आणि आशावादी वृत्तीची आहे. आर्ची प्रमाणे प्रेक्षकांना कुछ भिगे अल्फाज या चित्रपटातील गितांजलीची भूमिका देखील आवडेल अशी ओनिरला खात्री आहे.Also Read : ​सैराट फेम रिंकू राजगुरूच्या आगामी चित्रपटाचे नाव तुम्ही ऐकले का?