Join us  

मराठमोळ्या सचिन कारंडेचा “जॅक अँड दिल”, अरबाज खान मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 3:12 PM

सचिन कारंडेचा पे बॅक, विकल्प, कोटा जंक्शन आणि आता जॅक अँड दिल हा त्याच्या दिग्दर्शनातला हिंदी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

बॉलीवुडमध्ये सध्या मराठी टक्का खूप जोमात आहे. कलाकारांसोबत हिंदी सिने जगतात मराठी दिग्दर्शकांची फळी खूप जोमाने काम करतेय. विशेष बाब म्हणजे हे सर्वच वयाने तरुण आहेत, आणि त्यांच्यासोबत बॉलीवुडकर काम करतांना खुश आहेत. असाच मराठमोळा हिंदी चित्रपटाचा दिग्दर्शक सचिन कारंडे. महाराष्ट्रातील अकलूजचा तो राहणारा. पुण्याच्या ललित केंद्रातून नाट्यशास्त्राची पदवी घेऊन मुंबईत आल्यावर त्याने सुरुवातच हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनाने केली. पे बॅक, विकल्प, कोटा जंक्शन आणि आता जॅक अँड दिल हा त्याच्या दिग्दर्शनातला हिंदी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

 

सिनेमाबद्दल सचिन सांगतो की, लग्नानंतर नवरा-बायकोमधले प्रेम का कमी होते?, लग्नानंतर जबाबदाऱ्या, आपली प्राधान्य का वेगळी होतात? याचा शोध घेणारा सिनेमा म्हणजे ‘जॅक अँड दिल’. या सिनेमामध्ये अमित साध, अरबाज खान, सोनाल चौहान, एवलिन शर्मा हे मुख्य भूमिकेत आहेत.

सिनेमाच्या कथानकाबद्दल सचिन सांगतो की, “व्यावसायिक जीवन आणि वैयक्तिक जीवन यांच्यामधला तोल सांभाळता आलं पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यावेळी लग्नानंतर नवरा पैसे कमवण्याच्या इतका मागे की त्याला बायकोसाठी एक साधा रविवार देणे ही कठीण होते अशा परिस्थितीत प्रॉब्लेम चालू होतात. मग हे असं का होतं? हाच धागा पकडून बनवलेला हा सिनेमा आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “या सिनेमातील जॅक म्हणजेच अमित साध हा एका डिक्टेटिव्हच्या भूमिकेत दिसणार आहे तर, तर अरबाज खान याने वालीयाची भुमिका साकारली आहे. सोनल चौहान हिने वालियाच्या बायकोची भूमिका साकारली आहे. अरबाज खान आणि सोनाल चौहान यांचे ३ वर्षापूर्वी लग्न होते आणि अरबाज त्याच्या कामामध्ये इतका व्यस्त होतो की त्याला आपल्या बायकोकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. 

मात्र लग्नाच्या तीन वर्षानंतर त्याला आपल्या बायकोवर संशय यायला लागतो की तिचं बाहेर कुठे प्रेमप्रकरण आहे का. ती सारखी घराबाहेर का राहते ? हा विचार त्याच्या डोक्यात चालू असतानाच त्याला अमित साध हा एक वेडा, ज्याचं कशातच लक्ष नसतं पण त्याला अशी हेरगिरी करण्याची खूप हौस असते, अशा व्यक्तीशी गाठ पडते. मग अरबाज त्याला पाच दिवसांसाठी  आपल्या पत्नीच्या मागावर पाठवतो. पण जासूसगिरी करताना दुसऱ्याच दिवशी तो पकडला जातो. पण नंतर त्याची आणि सोनलची मैत्री होते आणि पाच दिवस संपल्यानंतर अमित अरबाजकडे जातो आणि त्याला सांगतो की, तुमच्या बायकोचे प्रेमप्रकरण माझ्यासोबतच चालू आहे. असं सांगितल्यानंतर त्यांच्या आयुष्यात घटना कशापद्धतीने वेगळी वळणं घेतात.अशी सिनेमाची कथा आहे. हा सिनेमा 2 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

अरबाज खान सोबत काम करताना आलेल्या अनुभवाविषयी दिग्दर्शक सचिन कारंडे सांगतो की, “या सिनेमाच्या निमित्ताने खान कुटुंबाशी संबंध आला, अरबाज खान हे खूप प्रोफेशनल अभिनेते आहेत, शिवाय ते स्वत: निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते म्हणून काम केल्यामुळे त्यांनी खूप सहकार्य केले. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना वेगळा अनुभव मिळाला.” कलेला भाषेची अडचण नसते, आणि बॉलिवूडमध्ये काम करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्नही असते. पण बॉलिवूडमध्ये काम हे थोडं मोठ्या प्रमाणावर असल्याने तिथे वेगळा अनुभव, वेगळी माणसं सगळंच वेगळं मिळतं, असे त्याने सांगितले. 

टॅग्स :अरबाज खान