Join us  

३४ वर्षांपासून अनुपम खेर फेडताहेत महेश भट्ट यांचे ‘कर्ज’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 12:33 PM

अनुपम जेव्हा केव्हा एखादी नवी भूमिका वा मोठा प्रोजेक्ट साईन करतात, तेव्हा ते महेश भट्ट यांच्याशी एकदा तरी चर्चा करतात

बॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शकांची मैत्री बॉलिवूडमध्ये तशी कठीणचं. पण बॉलिवूडचा एक अभिनेता आणि एक दिग्दर्शक गेल्या तीन दशकांपासून एकमेकांचे पक्के मित्र आहेत. किंबहुना हा दिग्दर्शक या अभिनेत्याचा गुरु आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेते अनुपम खेर आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याबद्दल. १९८४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘सारांश’मध्ये अनुपम यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका अनुपम यांच्या फिल्मी करिअरमधील अजरामर भूमिका मानली जाते. ‘सारांश’मध्ये ६५ वर्षांच्या म्हाताऱ्याची भूमिका साकारणे अनुपम यांच्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होते. पण त्यांनी या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला. प्रेक्षकांसह समीक्षकांनीही या भूमिकेचे मनापासून कौतुक केले. या चित्रपटानंतर अनुपम यांनी महेश भट्ट यांना आपले गुरू मानले. अनुपम जेव्हा केव्हा एखादी नवी भूमिका वा मोठा प्रोजेक्ट साईन करतात, तेव्हा ते महेश भट्ट यांच्याशी एकदा तरी चर्चा करतात. शिवाय सोबत आपल्या गुरूंना गुरूदक्षिणा म्हणून मानधनातील एक ठरावित रक्कमही देतात. 

गेल्या तीन दशकांपासून अनुपम न चुकता हा नियम पाळत आहेत. अलीकडे अनुपम यांनी आपल्या एका ब्रिटीश शोच्या मानधनातील काही रक्कम महेश भट्ट गुरूदक्षिणा म्हणून दिली.अनुपम यांनी याबद्दल अलीकडे सांगितले होते. मी इंडस्ट्रीत ३४ वर्षे पूर्ण केलीत. ‘सारांश’मधील ती भूमिका स्वीकारणे तुझी खूप मोठी चूक ठरेल, असे त्यावेळी अनेक लोक मला म्हणाले होते. पण तीच भूमिका माझ्यासाठी मैलाचा दगड ठरली. मी महेश भट्ट यांचा ऋणी आहे. तेच याच इंडस्ट्रीतील माझे गुरु आहे़, असे त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :अनुपम खेर