Join us  

अमरिश पुरींचा नातू वर्धन पुरी करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 5:32 PM

वर्धन पुरी लवकरच रोमँटिक लव्हस्टोरी असलेल्या एका चित्रपटात झळकणार आहे.

ठळक मुद्देवर्धन पुरीची बॉलिवूडमध्ये लवकरच एन्ट्री प्रसिद्ध दिग्दर्शक जयंतीलाल गडा यांच्या सिनेमात वर्धन साकारणार मुख्य भूमिका

बॉलिवूडमधील कलाकारांची मुले बॉलिवूडमध्ये एन्ट्री करीत असून आता आणखीन एक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवण्यासाठी आता त्यांचा नातू सज्ज झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरिश पुरी यांचा नातू वर्धन पुरी लवकरच बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे. 

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार वर्धन पुरी लवकरच रोमँटिक लव्हस्टोरी असलेल्या एका चित्रपटात झळकणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक जयंतीलाल गडा हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. वर्धन पुरी याने याआधी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांमधून कामे केली आहेत. इतकेच नाही तर ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘दावत ए इश्क’ या दोन बॉलीवूडपटांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्याने काम केले आहे. आता चित्रपटातील भूमिकेसाठी तो तयारी करतो आहे. या चित्रपटातील त्याची नायिकाही ठरल्याचे समजते आहे आणि तो सप्टेंबरमध्ये चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.वर्धनने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मला पीरियड ड्रामा सिनेमातून पदार्पण करायचे होते. मात्र काही कारणामुळे शक्य झाले नाही. मग, मला जयंती भाईंनी दुसऱ्या सिनेमाची ऑफर दिली. मला या सिनेमाची कथा आवडली आणि या चित्रपटाला होकारही दिला.  वर्धन त्याचे आजोबा अमरिश पुरी यांच्या आठवणींना उजाळा देत म्हणाला की, ‘मी नेहमीच त्यांना देवासमान मानतो. अभिनयामध्ये ते माझे प्रेरणास्थान आहे. माझे आणि त्याचे नात खूप जवळचे होते. ज्यावेळी त्यांचे निधन झाले. त्यावेळी मला माझे छत्र आणि सुरक्षा कवच गेल्यासारखे वाटले. यापुढे मी जे काही करेन ते सर्व माझ्या आजोबांना समर्पित असेल. माझा नवीन चित्रपटही मी त्यांनाच समर्पित करतो.’ अमरिश पुरी यांचा नातू असल्यामुळे वर्धन पुरीच्या अभिनयाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे वर्धन रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना भुरळ पाडेल का, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :अमरिश पुरी