Join us  

अन् ‘गब्बर’ इतका वैतागला की थेट सेटवर म्हशी आणून बांधल्या...; वाचा एक थ्रोबॅक भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 2:24 PM

गब्बर अर्थात अमजद खान यांना एक व्यसन होतं. त्याच व्यसनापायी घडलेला हा मजेदार किस्सा आजही ऐकवला जातो.

ठळक मुद्दे 48 वर्षांचे असताना 27 जुलै 1992 मध्ये त्यांचे निधन झाले. 80 च्या दशकात व्हिलन म्हणून त्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती.

‘कितने आदमी थे...’ हा डायलॉग आज इतक्या वर्षानंतरही प्रत्येकाच्या आठवणीत आहे. हा डायलॉग आहे 1975 साली रिलीज झालेल्या ‘शोले’ या सिनेमातला. गब्बर अर्थात अभिनेते अमजद खानने हा डायलॉग अगदी अमर केला. अमजद खान (Amjad Khan) आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे भन्नाट किस्से आजही इंडस्ट्रीत ऐकवले जातात.अमजद खान यांनी पडद्यावर खलनायकाच्या भूमिका साकारल्यात.पण रिअल लाईफमध्ये ते अतिशय विनोदी स्वभावाचे होते. त्यांना आणखी एक व्यसन होतं, ते म्हणजे चहाचं. 

होय, गब्बर अगदी पाण्यासारखा चहा प्यायचा. येता जाता त्याला चहा लागायचा. त्याचे हे चहाचं व्यसन माहित असल्याने शूटींगदरम्यान त्याच्या चहाची खास व्यवस्था असायची. पण एकदा पृथ्वी थिएटरमध्ये एका नाटकाची तालीम सुरु होती. गब्बर चहाशिवाय राहूच शकत नव्हता. त्याने चहा मागितला. पण चहा आलाच नाही़. यानंतरही चहा मागितल्यावर त्याला तो मिळाला नाही.

 गब्बर अगदीच वैतागला. चाय क्यों नहीं मिल रही है भाई, असे विचारल्यावर दूध संपल्याने चहा मिळत नसल्याचे स्पॉटबॉयने त्याला सांगितले. दुस-या दिवशी पुन्हा तालीम होतीच. यावेळी मात्र गब्बर चहाच्या दूधाची सोय करूनच सेटवर गेला. होय, तो एकटा गेला नाही तर चक्क दोन म्हशी सोबत घेऊनच पोहोचला. दूधाची व्यवस्था केलीये. आता दिवसभर चहा मिळायला हवा, असे जाताच त्याने जाहिर करून टाकले.   दोन म्हशी पाहून सेटवरचा प्रत्येकजण पोट दुखेपर्यंत हसला नसेल तर नवल. गब्बरचा हा किस्सा आजही ऐकवला जातो, तो म्हणूनच...

अमजद खान हे पडद्यावर जितके कठोर दिसायचे, त्याउलट खऱ्या आयुष्यात ते फार विनम्र होते. केवळ ते 48 वर्षांचे असताना 27 जुलै 1992 मध्ये त्यांचे निधन झाले. 80 च्या दशकात व्हिलन म्हणून त्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. त्यांनी 200 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं होतं. अमजद खान हे फारच साधं जीवन जगायचे. 

टॅग्स :अमजद खान