Join us  

क्या बात है...! अमिताभ बच्चन झळकणार मराठी सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 7:52 PM

बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही मराठी चित्रपटाने भुरळ पाडली असून लवकरच ते मराठी चित्रपटात झळकणार आहेत.

बॉलिवूडमधील कलाकारांना मराठी सिनेइंडस्ट्रीची भुरळ चांगलीच पडली आहे. त्यामुळे कोणी मराठी सिनेमात अभिनय करत आहे तर कोणी मराठी चित्रपटांची निर्मिती. बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही मराठी चित्रपटाने भुरळ पाडली असून लवकरच ते मराठी चित्रपटात झळकणार आहेत. ते 'एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या २० मे पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. 

एका मराठी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, 'एबी आणि सीडी' या चित्रपटात अभिनेते विक्रम गोखले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या मित्राच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसणार आहेत. या चित्रपटासाठी मुंबईतील एक भला मोठा हॉल शूटिंगसाठी घेण्यात येणार आहे आणि या ठिकाणी तीन ते पाच दिवस चित्रीकरण चालणार आहे आणि या चित्रीकरणात अमिताभ बच्चन सहभागी होणार आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी दीपक सावंत यांनी निर्मिलेल्या आणि श्रीधर जोशी दिग्दर्शित आक्का (१९९४) या मराठी चित्रपटात जया बच्चन यांच्यासोबत तू जगती अधिपती या गणपती आरतीत भूमिका साकारली होती. त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षांनी ते मराठी चित्रपटाच्या पडद्यावर पहायला मिळणार आहेत.

एबी आणि सीडी या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद लेले करत आहेत तर या चित्रपटाची कथा-पटकथा आणि संवाद हेमंत एदलाबादकर यांच्या लेखणीतून साकार झाले आहेत. हेमंत एदलाबादकर यांनी याबाबत सांगितले की, विक्रम गोखले, मिलिंद लेले आणि मी आम्ही तिघे जण बच्चन यांना भेटलो. त्यांना सिनेमाची कथा ऐकवली आणि विचार करून या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. त्यांना ही कथा खूप आवडली.

एबी आणि सीडी हा हलकाफुलका कौटुंबिक सिनेमा असून या चित्रपटातील इतर कलाकारांची निवड अद्याप झालेली नाही. त्यामुळे मराठी चित्रपटात अमिताभ बच्चन यांना काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनविक्रम गोखले