अभिनेते अमिताभ बच्चन ‘तीन’ या चित्रपटात आजोबांची भूमिका साकारत आहेत. खºया आयुष्यात त्यांना तीन नातवंडे आहेत. आजोबा-आजी होण्यात खूप मजा असते. तुम्ही तुमच्या मुलांपेक्षाही तुमच्या नातवंडांमध्ये अधिक गुंतलेले असतात असे अमिताभ बच्चन यांचे म्हणणे आहे. ‘तीन’(ळी3ल्ल)या त्यांच्या आगामी चित्रपटाबाबत त्यांनी सीएनएक्सच्या एडिटर जान्हवी सामंत यांच्याशी मारलेल्या गप्पा...
‘तीन’ या आपल्या आगामी चित्रपटाबद्दल सांगा
‘तीन’ हा एका कोरियन सिनेमाचा रिमेक आहे. जॉन बिस्वास हा मध्यवर्गीय अँग्लो-बंगाली गृहस्थ आणि त्याची नात यांची ही कथा. जॉनची नात अपघाताने हरवते. कदाचित तिचे अपहरण होते. ‘तीन’ ही सूडकथा नव्हे तर शोधकथा आहे. जॉन बिस्वास हा शारिरीकदृष्ट्या अशक्त पण तेवढाच दृढनिश्चियी असतो. नातीचा शोध घेण्यासाठी तो घराबाहेर पडतो. या चित्रपटात विद्या बालनही आहे. पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेतील विद्या आणि माजी पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेतील नवाजुद्दीन सिद्दीकी हेही जॉनला मदत करतात. ‘तीन’ हा एक इमोशनल थ्रीलर आहे.
नव्या, अगस्त्या आणि आराध्या अशा तीन नातवंडांचे तुम्ही आजोबा. नातवांसोबतच्या या नात्याकडे आपण कसे बघता?
हे एक सुंदर नाते असते. तुम्ही तुमच्या मुलांपेक्षा नातवंडांमध्ये अधिक रमता. मूलं होतात पण सोबत अनेक जबाबदाºयाही असतात. तुम्ही कामात गुंतलेले असता. कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी झगडत असता. आई-वडील म्हणून मुलांची शाळा, त्यांच्यावरील संस्कार, शिस्त यावर अधिक भर असतो. पण नातवंडं होतात तो काळ निवांतपणाचा असतो. मुलांसोबत खेळण्यासाठी वेळ नसतो. पण नातवंडांसोबत निर्धास्तपणे खेळता येतं, हसता येतं. त्यामुळे आजी-आजोबा होणे हे स्वर्गीय सुख आहे.
‘तीन’चे शूटिंग कोलकात्यात झाले. या शहरात आपण अनेक वर्षे घालवली आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
होय, चित्रपटाचे शूटिंग कोलकात्यात झाले. कोलकात्याशी माझे घट्ट ऋणानुबंध आहेत. याच शहरात मला माझा पहिला जॉब मिळाला. माझ्या करिअरच्या सुरुवातीचे सात ते आठ वर्षे मी या शहरात घालवलीत. आज वेगवेगळ्या कारणांसाठी कोलकात्याला जातो, तेव्हा तो काळ, त्या आठवणी सगळे डोळ्यांपुढे येते. मी साठच्या दशकात इथे राहिलेलो. आजघडीला कोलकाता शहर पूर्णपणे बदलले आहे. पण एक गोष्ट इतक्या वर्षांनंतरही जशीच्या तशी आहे. ती म्हणजे कोलकात्यातील माणसं. कोलकात्यातील माणसं जराही बदलेली नाहीत. त्यांच्यातील सहृदयता, प्रेम,माया सगळे काही तसेच आहे.
आपण अनेक चित्रपट केलेत. त्यातील अनेक व्यक्तिरेखा जगले. भावनाप्रधान चित्रपट वा व्यक्तिरेखा साकारताना अभिनेता म्हणून जास्त कस लागतो का?
होय, असे होते. एखादा अतिशय भावनाप्रधान सीन असेल आणि त्यात जीव ओतायचा तर त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. अशावेळी ती भूमिका साकारताना मी आयुष्यातील विचित्र प्रसंगांचा विचार करतो. कधीकधी माझा हा फार्म्युला अगदी अचूक लागू होऊन पडद्यावरचा सीन मी अगदी जिवंत करतो. कधीकधी उलटेही होते. पण खरे सांगायचे तर चित्रपटातील व्यक्तिरेखेशी एकरूप झाले की, बाकी सगळे सोपे ठरते. व्यक्तिरेखेशी एकरूप झाल्यावर इमोशनल होण्यासाठी ग्लिसरीन वा खोट्या अश्रूंची गरज भासत नाही.
‘बेटी बचाओ’, ‘पोलिओ’वा ‘क्षयरोग’ अशा विविध सामाजिक अभियानांमध्ये आपला सहभाग आहे. अशा मुद्यांवर समाजाचे विचार बदलण्यात एका सेलिब्रिटीची किती आणि कशी मदत होते?
‘बेटी बचाओ’, टीबी, पोलिओ, डायबटीज अशा अनेक मुद्यांवरील अभियानात मी सहभाग नोंदवला आणि या माध्यमातून बरीच जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. अनेक सामाजिक मुद्यांवरील जनजागृतीत माझी मदत होऊ शकेल, असे जेव्हा केव्हा मला वाटते, तेव्हा मी सहकार्यासाठी तत्पर असतो. समाजाच्या भल्यासाठी माझा चेहरा, माझा आवाज कामी येत असेल. यातून काहीतरी चांगले निष्पण्ण होत असेल तर मला याचा आनंदच आहे.
‘बेटी बचाओ’च्या निमित्ताने आपण समाजाला काय संदेश द्याल?
देशाची ५० टक्के शक्ती ही नारी शक्तीत दडलेली आहे. अशास्थितीत महिलांना आदर आणि सन्मान मिळायला हवा. दुर्दैवाने आपल्या देशाला चिटकलेली काही जुन्या समजुती व विचारांची जळमटं अद्यापही दूर झालेली नाहीत. मुलींना शिकवून काय फायदा, असा विचार करणारे लोक आजही आपल्या अवती-भवती आहेत. हे विचार बदलण्याची गरज आहे. एक अभिनेता म्हणून तुम्ही मला प्रेम आणि आदर दिलात. ‘बेटी बचाओ’ अभियानासाठीही मला असेच प्रेम आणि पाठिंबा द्या, अशीच मी विनंती करेल.
तुमच्या कुटुंबाला अनेकदा सोशल मीडियाच्या टीकेला सामोरे जावे लागते. सोशल मीडियाने दिलेल्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यांचा गैरवापर होतोय, असे आपल्याला वाटते का?
सोशल मीडियाने आपल्याला अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यापूर्वी असे स्वातंत्र्य आपल्याला नव्हते. स्वातंत्र्य देणारे माध्यम असेल तर लोकांनी ते का वापरू नये, त्याचा फायदा का घेऊ नये? सेलिब्रिटींना सोशल मीडियावर केवळ टीकाच वाट्याला येते, असेही मुळीच नाही. यापेक्षा कितीतरी अधिक पट प्रेम आणि प्रशंसाही सोशल मीडिया सेलिब्रिटींना देते. मी माझ्यावर टीका करणाºया कुठल्याही फॉलोअर्सला ब्लॉक वा डिलीट केलेले नाही. माझ्यामते, प्रशंसेप्रमाणेच टीकाही तुम्हाला पचवता यायला हवी. तुम्ही सोशल मीडियाशी कनेक्ट असाल तर त्यावरील लोकांच्या बºया-वाईट प्रतिक्रियाही तुम्हाला खिलाडू वृत्तीने स्वीकारता यायला हव्यात.