Join us  

अमिताभ बच्चन करणार १,३९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्त, ७० शेतकरी येणार त्यांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 6:18 PM

उत्तर प्रदेशमधील कर्जबाजारी शेतकऱ्यांना बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन भेटणार आहेत

ठळक मुद्दे अमिताभ बच्चन फेडणार शेतकऱ्यांचे ४.०५ कोटी रुपयांचे कर्जशेतकऱ्यांची कर्जाच्या चक्रातून सुटका करण्यासाठी अमिताभ यांनी उचलले हे पाऊल

उत्तर प्रदेशमधील कर्जबाजारी शेतकऱ्यांना बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन भेटणार आहेत. १३९८ शेतकऱ्यांचे कर्ज ते स्वतः भरणार आहेत. या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पैसे बँकामध्ये भरुन ते कर्जमुक्त झाल्याचे कागदपत्र घेऊन संबंधित शेतकऱ्यांना अमिताभ बच्चन भेटणार आहेत. उत्तर प्रदेशातील ७० शेतकऱ्यांना मुंबईत आणण्याची आणि त्यांच्या कर्ज फेडीचे सर्व व्यवस्था केल्याचे बिगबींच्या प्रवक्त्याने सांगितले.

उत्तर प्रदेशातील एकूण १,३९८ शेतकऱ्यांचे ४.०५ कोटी रुपयांचे कर्ज अमिताभ बच्चन फेडणार आहेत. शेतकऱ्यांचे कर्ज चुकवण्यासाठी त्यांनी बँक ऑफ इंडियासोबत वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) करार केला आहे. २६ नोव्हेंबर रोजी ते शेतकऱ्यांना भेटतील आणि त्यांना बँकेची कागदपत्रे सुपूर्त करतील. यासाठी ७० शेतकऱ्यांना मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले असून यासाठी रेल्वेचा पूर्ण डब्बा बुक करण्यात आला आहे.याबाबत बोलताना अमिताभ बच्चन यांचा प्रवक्ता म्हणाला, अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशातील १३९८ शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्जही फेडले आहे. निवडक ७० शेतकऱ्यांना मुंबईत बोलवण्यात आले असून त्यांना अमिताभ कर्ज फेडीची कागदपत्रे सुपूर्त करणार आहेत.शेतकऱ्यांची कर्जाच्या चक्रातून सुटका करण्यासाठी अमिताभ यांनी हे पाऊल उचलले आहे. मुंबईमध्ये केबीसीच्या १०व्या पर्वाच्या लॉन्चिंगवेळी त्यांनी ही घोषणा केली होती. कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचून आपण अनेकदा व्यथित होतो, असेही अमिताभ त्यावेळी म्हणाले होते. 'काही वर्षांपूर्वी मी विशाखापट्टणममध्ये चित्रीकरण करत होतो. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी १५ हजार, २० हजार आणि ३० हजार रुपयांचे कर्ज फेडता न आल्याने आत्महत्या केल्या होत्या. हे अतिशय वाईट होते. त्यावेळी मी मुंबईला परतल्यावर ४० ते ५० शेतकऱ्यांना मदत केली होती. आता शेतकऱ्यांना कर्जाच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी करणार आहे,' असे अमिताभ यांनी सांगितले होते. 

टॅग्स :अमिताभ बच्चन