Join us  

बापूच्या सिनेमात ‘बाबूजी’ला मिळाला होता रोल! मानधनाची रक्कम ऐकून बसला होता मोठा धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 10:46 AM

१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटाने संपूर्ण जगभर प्रचंड लोकप्रियता मिळविली. ‘गांधी’ चित्रपटासाठी ११ वर्गांमध्ये ऑस्कर नामांकने मिळाली होती. त्यानंतर ‘गांधी’ने आठ वर्गांमध्ये ‘ऑस्कर’ पटकावले.

ठळक मुद्देभारतामध्ये चित्रिकरण करण्यासाठी, व्य‌क्तिरेखा निवडण्यासाठी अ‍ॅटनबरोंच्या टीमने प्रचंड कष्ट घेतले.

बॉलिवूडमध्ये बाबूजी नावाने ओळखले जाणारे अभिनेते आलोक नाथ यांनी आपल्या करिअरची सुरुवात दिग्गज दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटापासून केली होती. म्हणजेच, बॉलिवूडमध्ये येण्याआधीच आलोकनाथ यांनी हॉलिवूड चित्रपट साईन केला होता. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या अनेकार्थाने गाजलेल्या ‘गांधी’ सिनेमात आलोक नाथ यांची काहीच मिनिटांची भूमिका होती. ही भूमिका आलोक नाथ यांना कशी मिळाली, हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, ‘मी दिल्लीत हिंदू कॉलेजात असताना कॉलेज थिएटरमध्ये काम करत होतो. कॉलेज संपल्यानंतर मी एनएसडीमध्ये प्रवेश घेतला. यादरम्यान फावल्या वेळेत वा सुट्टीमध्ये मी प्रोफेशनल थिएटर व टीव्ही करत होतो. 1986 मध्ये एनएसडीमध्ये माझे शेवटचे वर्ष होते. यादरम्यान मुंबईहून डॉली ठाकोर आमच्या संस्थेत आल्या होत्या. त्या रिचर्ड एटनबर्ग यांच्या ‘गांधी’ साठी काही जणांची निवड करणार होत्या.

आम्ही अगदी व्यवस्थित तयार होऊन ऑडिशनसाठी गेलोत. रिचर्ड अ‍ॅटनबरो हेही त्यावेळी उपस्थित होते त्यांनी मला वरपासून खालपर्यंत न्याहाळले. जणू ते अ‍ॅक्टर नाही तर घोडा खरेदी करायला आले होते. पण त्यांचे डोळे माझ्या आत्म्याला भेदून गेले होते.  त्यांच्या चेह-यावर कुठलेही भाव नव्हते. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी उतावीळ होतो. अचानक, डॉली हा बरा आहे, असे अ‍ॅटनबरो म्हणाले. मग काय, आलोक तुला आम्ही साईन केले.  तू गांधींच्या एका सहायकाच्या भूमिकेत असशील, असे डॉली मला म्हणाली. तू या भूमिकेसाठी किती पैसे घेशील? असा प्रश्न लगेच तिने मला विचारला. त्या कळात कुठल्याही नाटकासाठी 10 दिवस रिहर्सल केल्यावर  60 रूपये मिळायचे. मला कुणी तोपर्यंत कधीच पैशांबद्दल विचारले नव्हते. त्यामुळे मी डॉलीला काय उत्तर देऊ मला समजेना. मी शांत बसलो. 

अखेर डॉलीच म्हणाली, चल 20 मध्ये फायनल करू यात. तिच्या तोंडून 20 हा आकडा ऐकून मला धक्का बसला होता. नाटकासाठी 60 रूपये अन् ही बया हॉलिवूड चित्रपटासाठी 20 रूपये देणार? असे माझेच मला वाटले. पण पुढे डॉली जे काही बोलली, तो माझ्यासाठी आणखी मोठा धक्का होता. चल, 20 हजारात डिल पक्की. हा घे तुझा अ‍ॅडव्हान्स, असे ती म्हणाली. तिच्या तोंडून 20 हजार ऐकून मी अवाक् झालो होतो. केवळ काही मिनिटांच्या रोलसाठी मला 20 हजार मिळणार, यावर माझा विश्वास बसेना. त्यांनी  अ‍ॅडव्हान्स दिला, त्यावरही मला विश्वास बसेना. या नोटा नकली तर नाहीत, असाही विचार माझ्या मनात आला होता. मी सगळे पैसे माझ्या आईला दिलेत. ती खूश होती. बरे झाले, तू वडिलांसारखा डॉक्टर बनला नाहीस. त्यांना तर वर्षभरातही 10 हजारही मिळत नाहीत, असे आई मला म्हणाली होती.’

टॅग्स :आलोकनाथमहात्मा गांधी