Join us  

अक्षय खन्ना म्हणतोय, माझ्यासाठी तो कठीण काळ होता, वाचा सविस्तर

By तेजल गावडे | Published: September 08, 2019 6:00 AM

अभिनेता अक्षय खन्ना 'सेक्शन ३७५' चित्रपटात झळकणार आहे.

अभिनेता अक्षय खन्ना लवकरच कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि एससीआईपीएल निर्मित व अजय बहल दिग्दर्शित 'सेक्शन ३७५' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो गुन्हेगारांचा वकील तरूण सलुजाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

'आर्टिकल १५' नंतर आता 'सेक्शन ३७५' अशा मुद्द्यांवर चित्रपट बनत आहेत, त्याबद्दल तुझं काय मत आहे?चित्रपट बनतात ते मनोरंजनासाठी. मनोरंजनासोबत काही गोष्टी प्रेक्षकांना चांगल्या पद्धतीनं समजत असतील किंवा त्यांना त्यातून शिकवण मिळणार असेल तर ही सकारात्मक बाब आहे. 'आर्टीकल १५' चित्रपटानं दाखवून दिलं आहे की कायद्यांवर चित्रपट बनवले तर त्याला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देऊ शकतात. प्रेक्षकांना डोक्यात ठेवूनच चित्रपट बनविले जातात. प्रत्येक प्रकारचे चित्रपट बनले पाहिजेत. आम्ही 'सेक्शन ३७५' वर चित्रपट बनविला आहे. कारण या सेक्शनची समाजात बऱ्याचदा चर्चा होताना पहायला मिळते. या मुद्द्यावर चर्चा किंवा वादविवाद होत असतात. तेव्हा लोकांना वाटतं की हा कायदा थोडाफार बदलू शकतो. यावरच आमच्या चित्रपटाची कथा आधारीत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक ठरवतील की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. चित्रपट कोणाचीही बाजू घेत नाही. चित्रपटात कोर्ट रुममधील एक प्रकरण दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे की, न्यायाधीशाने योग्य न्याय दिला आहे की नाही. 

या चित्रपटाची कथा जेव्हा तुला ऐकवली, त्यावेळी तुझी काय प्रतिक्रिया होती?मला चित्रपटाचा विषय खूप आवडला. एकाच मुद्द्याचे अनेक पैलू, पॉइंट्स ऑफ व्ह्यू व विचारधारा असतात. कधी कधी एकाच बाजूला जास्त महत्त्व दिलं जातं. तर दुसऱ्या बाजूवर दबाव टाकला जातो. अशा बाजूलाही आवाज देणं किंवा चर्चेचा मुद्दा बनवणं गरजेचं असतं. आपल्या देशात प्रत्येकाच्या मताला सन्मान व संधी दिली जाते ही खूप चांगली बाब आहे. सर्व मते व मतभेदांना समाजाने ऐकलं पाहिजे, असं मला वाटलं.

या चित्रपटात एखाद्या प्रकरणाचा संदर्भ घेण्यात आला आहे का?या चित्रपटाची कथा कोणतेही प्रकरण किंवा घटनेवर आधारीत नाही आहे. चित्रपटात एक सामान्य मुद्दा रेखाटण्यात आला आहे. जो आपण दररोज वर्तमानत्रात वाचतो व बातम्यांमध्ये ऐकतो. ज्यावर लोक चर्चा करतात. 

ट्रेलरमध्ये तू आरोपीच्या बाजूने बोलताना दिसतो आहे, तर नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे?कायद्याचा गैरवापर करणं चुकीचं आहे. अशी काही प्रकरणं हल्ली समोर आली आहेत. ज्यात कायद्याचा गैरवापर केला गेल्याचं पाहायला मिळालं. 'सेक्शन ३७५' मध्ये कायद्याचा गैरवापर केला गेल्याचं दाखवलं आहे की नाही, हे तुम्हाला माहित नाही. कारण तुम्ही फक्त ट्रेलर पाहिला आहे. खरी कथा व मुद्दा काय आहे, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. सेक्शन ३७५ बद्दल जास्त खोलात बऱ्याच लोकांना माहित नसेल. तेच आम्ही आमच्या चित्रपटातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  

या चित्रपटातील वकीलाच्या भूमिकेची तयारी तू कशी केलीस?मी स्क्रीप्टनुसार आणि दिग्दर्शकाशी चर्चा करून त्याला काय मांडायचं आहे, त्यानुसार मी माझी भूमिका साकारतो. या भूमिकेसाठी मी वेगळी अशी तयारी केली नाही. मी जे काही काम करतो ते प्रामाणिकपणे करतो आणि त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतो.

तुझी सहकलाकार रिचा चड्ढाबद्दल काय सांगशील?आम्ही चित्रपटात एकमेकांविरोधात लढताना दिसतो आहे. कोर्टरूममध्ये आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत. मात्र मी रिचाबद्दल हे नक्कीच सांगू शकतो की ती अशाप्रकारच्या मुद्द्यांवर प्रकर्षानं मत मांडत असते.

आतापर्यंतच्या करियरमधील तुझा आवडता चित्रपट व भूमिका कोणती?आजच्या तारखेत मला सेक्शन ३७५ हा चित्रपट माझा फेव्हरेट वाटतो. कारण यापूर्वी मी अशा जॉनरचा चित्रपट केला नव्हता. कोर्टरुम ड्रामा आणि पूर्णवेळ वकीलाची भूमिका असणाऱ्या चित्रपटात मी काम केलं नव्हते. या चित्रपटाची कथा व माझी भूमिका, संवाद खूप उत्तमरित्या लिहिण्यात आली आहे. खूप कालावधीनंतर अशाप्रकारच्या चित्रपटात काम करण्याची मला संधी मिळाली. स्वतःला मी खूप नशीबवान मानतो की ही स्क्रीप्ट दुसऱ्या कोणाकडे गेली नाही.

 

बॉलिवूडमध्ये काही तू गायब होतास, त्याबद्दल काय सांगशील?मी नेहमी म्हणतो की एखादा कलाकार जेव्हा काम करत नसतो त्यावेळी तो कठीण प्रसंगाला सामोरे जात असतो. मग तो करियरच्या सुरूवातीच्या काळात काम मिळवण्यासाठी व टॅलेंट दाखवण्यासाठी धडपड करत असेल. किंवा काम मिळत नाही म्हणून घरी बसला असेल. क्रिएटिव्ह व्यक्तीसाठी हा खूप कठीण काळ असतो. माझ्यासाठी देखील हा खूप कठीण काळ होता. त्यावेळी मला जे काम हवं होतं तसं मिळत नव्हतं. म्हणून मी काम करत नव्हतो. तो कालावधी माझ्यासाठी खूप कठीण होता. 

सोशल मीडियावर अकाउंट सुरू करण्याचा काही विचार आहे का?सोशल मीडियावर मी सक्रीय नाही आहे. पण मी लवकरच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह होणार आहे. ट्विटर व इंस्टाग्रामवर माझे मी अधिकृत अकाउंट लवकरच सुरू करणार आहे.  आगामी प्रोजेक्टबद्दल सांग?'सेक्शन ३७५' चित्रपटानंतर माझा रोमँटिक कॉमेडी जॉनर असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'सब कुशल मंगल'. अशाप्रकारे माझे यावर्षी तीन चित्रपट प्रदर्शित होतील.

टॅग्स :अक्षय खन्नारिचा चड्डा