Join us  

अजय-अतुलच्या संगीतावर पुन्हा थिरकणार बॉलीवूड,‘शमशेरा’पाठोपाठ या सिनेमालाही देणार संगीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 9:46 AM

हिंदी सिनेमांच्या गाण्यांनाही अजय-अतुल या संगीतकार जोडीने सुमधुर चाली दिल्या. कधी प्रेमाच्या रंगात दंग व्हायला लावणाऱ्या रोमँटिक तर कधी लहानथोरांना थिकायला लावणारे धमाकेदार संगीत अजय-अतुल या जोडीने दिले.

आपल्या एकाहून एक सरस आणि हिट चालींनी अजय-अतुल जोडीने संगीतप्रेमींना अक्षरक्षा याड लावले आहे. त्यामुळेच की काय या  जोडीचा डंका मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवुडमध्येही वाजतो आहे. हिंदी सिनेमांच्या गाण्यांनाही अजय-अतुल या संगीतकार जोडीने सुमधुर चाली दिल्या. कधी प्रेमाच्या रंगात दंग व्हायला लावणाऱ्या रोमँटिक तर कधी लहानथोरांना थिकायला लावणारे धमाकेदार संगीत अजय-अतुल या जोडीने दिले.

(SEE PICS: असा आहे अजय-अतुलचा पुण्यामधील आलिशान आशियाना!)

आता पुन्हा एकदा ही जोडी बॉलीवुडच्या रसिकांना वेड लावण्यासाठी येत आहे. 'शमशेरा' या आगामी सिनेमाचं संगीत अजय-अतुल देत असल्याचं आम्ही सांगितलं होतं. आता शमशेरापाठोपाठ पुन्हा एका नव्या हिंदी सिनेमासाठी अजय-अतुल ही जोडी संगीत देत आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानीपत' या आगामी सिनेमाला अजय-अतुल संगीत देणार आहेत. सध्या या सिनेमाच्या संगीत निर्मितीची प्रक्रिया सुरु आहे. अजय-अतुल हे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत बसून या सिनेमाच्या संगीतासाठी काम करत असल्याचा फोटो समोर आला आहे. 

गोवारीकर हे अजय-अतुलचं संगीत लक्षपूर्वक ऐकत असल्याचं यांत पाहायला मिळतंय. ऐतिहासिक विषयावरील सिनेमा करण्यासाठी प्रसिद्ध असलेले आशुतोष गोवारीकर यांचा 'पानीपत' हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.पानीपत या सिनेमाला भव्यदिव्य करण्यासाठी आशुतोष गोवारीकर कोणतीही कसर सोडणार नसल्याचे बोललं जात आहे. त्यामुळेच या सिनेमाला साजेसं संगीत देण्याची जबाबदारी अजय-अतुलवर त्यांनी सोपवली आहे.

शिवाय सिनेमा हिट करण्यासाठी आशुतोष शनिवारवाड्याचा  भव्यदिव्य असा सेट उभारणार आहेत. हुबेहूब शनिवारवाडा साकारण्याची जबाबदारी त्यांनी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर सोपवली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारवाडा सेट उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत या सिनेमात अर्जुन कपूर, संजय दत्त, कृती सॅनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 6 डिसेंबर रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

गोवारीकर म्हणतात 'अजय- अतुलचे संगीत जेवढे उथळ आणि खडबडीत असते तेवढेच अर्थपूर्ण आणि मनात घर करणारे असते. त्या दोघांना संगीतातील बारीक बारीक गोष्टींची जाण आहे. कुठे आणि केव्हा कसले संगीत चांगले वाटले यांची त्यांना जाण आहे आणि ह्या चित्रपटासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे म्हणूनच आम्ही त्या दोघांची निवड पानीपतसाठी केली आहे.

 

टॅग्स :अजय-अतुलआशुतोष गोवारिकर