Join us  

वडिलांच्या निधनानंतर विंदू दारा सिंह करत होते पार्टी, समोर अमिताभ बच्चन आले अन्...सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 4:04 PM

आम्ही शॅम्पेन फोडली, पार्टी सुरु केली आणि तितक्यात दरवाजाची बेल वाजली. मी दार उघडलं तेव्हा समोर खुद्द अमिताभ बच्चन होते. ते शोक व्यक्त करण्यासाठी दु:खात सहभागी होण्यासाठी आले होते.

पहलवान आणि अभिनेते दारा सिंह (Dara Singh) यांना 'रामायण' मालिकेतील भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. २०१२ साली त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दारा सिंह यांचा मुलगा आणि अभिनेता विंदू दारा सिंह (Vindu Dara Singh) याने नुकताच एक किस्सा सांगितला. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने शॅम्पेन घेऊन आनंद साजरा केला होता. त्याचक्षणी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) घरी आले आणि त्यांना हे पाहून धक्काच बसला. नेमका काय आहे तो किस्सा?

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत विंदू दारा सिंह म्हणाले, 'माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा सेलिब्रेशन करा, रडू नका. त्यांचं निधन झालं तेव्हा आमचं सर्व कुटुंब एकत्र आलं. रात्री आम्ही बहीण, भाऊ, जीजा सर्वांनी एकत्र येत वडिलांच्या इच्छेनुसारच त्यांना निरोप द्यायचं ठरवलं. आम्ही शॅम्पेन फोडली, पार्टी सुरु केली आणि तितक्यात दरवाजाची बेल वाजली. मी दार उघडलं तेव्हा समोर खुद्द अमिताभ बच्चन होते. ते शोक व्यक्त करण्यासाठी दु:खात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यांना वाटलं असेल की हे काय चाललंय? त्यांनी पांढरे कपडे घातले होते आणि संपूर्ण दिवस शूट केल्यानंतर ते रात्री आले होते.'

विंदू पुढे म्हणाले, "त्यांनी मला विचारलं की हे काय सुरु आहे? मी म्हणालो, वडिलांनी आम्हाला सेलिब्रेशन करण्यास सांगितले होते. त्यांनी आई कुठे आहे विचारलं. मी सोफ्याच्या दिशेने बोट दाखवलं. ते माझ्या आईजवळ बसले तिचं सांत्वन केलं. पण आम्हाला असं पाहून त्यांना धक्काच बसला होता."

दारा सिंह सर्वात यांचं व्यक्तिमत्व एकदम भारदस्त होतं. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली होती. अमिताभ बच्चन यांनीही ट्वीट करत 'सर्वात महान आणि चांगला माणूस', एक पर्व संपलं असं ट्वीट केलं होतं. तर अभिषेकनेही ट्वीट करत त्यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण काढली होती.

टॅग्स :दारा सिंगअमिताभ बच्चनबॉलिवूड