Join us  

कोरोना संकट : थलायवा मदतीसाठी धावला; वर्कर्सला दिली इतक्या लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 5:11 PM

कोरोना संकटामुळे बॉलिवूडप्रमाणेच साऊथ इंडस्ट्रीही ठप्प आहे.

ठळक मुद्देसाऊथच्या अनेक कलाकारांनी वर्कर्सला मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोनामुळे अख्खे जग जागच्या जागी थांबलेय. देशातही परिस्थिती वेगळी नाही़ घरातून बाहेर पडू नका, स्वत:सोबत इतरांचा जीव वाचवा, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहेत. समाजाच्या भल्यासाठी किंबहुना कोरोनाचे संकट परतून लावण्यासाठी आपण सर्वांनी घरात राहणे आपले कर्तव्य आहे. पण सगळीकडे लॉकडाऊन असताना तळहातावर पोट असणा-यांचे मात्र हाल आहेत. दिवसभर काम केल्यानंतर त्यांच्या घराचा गाडा चालतो, त्यांच्या चिंता वाढल्या आहेत. आपल्या फिल्म इंडस्ट्रीतही असे अनेकजण आहेत. इंडस्ट्रीतील अनेक वर्कर्स सध्या काम बंद असल्याने घरी बसून आहेत. प्रोड्सर्स गिल्ड, अनेक फिल्ममेकर्स या वर्कर्सची मदत करत आहेत. आता थलायवा रजनीकांत यांनी या वर्कर्सला मदतीचा हात दिला आहे. होय, रजनीकांत यांनी डेली वेज वर्कर्सच्या मदतीसाठी 50 लाख रूपये दिले आहेत.

कोरोना संकटामुळे बॉलिवूडप्रमाणेच साऊथ इंडस्ट्रीही ठप्प आहे. शूटींग रद्द झाल्याने आणि परिणामी आवक बंद झाल्याने हजारो वर्कर्स चिंतेत आहेत. अशात फिल्म एंम्पॉइज फेडरेशन ऑफ साऊथ इंडिया या वर्कर्ससाठी मदतीचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत साऊथचे अनेक स्टार्स पुढे आलेत. अभिनेता शिवकुमार व त्यांची दोन्ही मुले सुपरस्टार सूर्या व कार्ति यांनी प्रत्येकी 10 लाख रूपये दिलेत. विजय सेतुपती यांनी 10 लाख रूपयांची मदत जाहीर केली. सुपरस्टार रजनीकांत यांनी सर्वाधिक 50 लाख रूपयांची मदत दिली. विशेष म्हणजे, फिल्म एंम्पॉइज फेडरेशन ऑफ साऊथ इंडियाने जितक्या रकमेच्या मदतीचे लक्ष्य ठेवले होते, त्याची 25 टक्के रक्कम रजनीकांत यांनीच दिली आहे.याशिवाय साऊथच्या अनेक कलाकारांनी वर्कर्सला मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता पार्थिबन यांनी 25 किलो तांदळाचे वाटप केले आहे.

टॅग्स :रजनीकांतकोरोना वायरस बातम्या