प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 17:37 IST
कल्पना अय्यर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अंजाम, राजा हिंदुस्थानी यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले ...
प्रेमात अपयश आल्याने ही अभिनेत्री राहिली आयुष्यभर अविवाहित, अभिनय सोडून आता करते हे काम
कल्पना अय्यर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अंजाम, राजा हिंदुस्थानी यांसारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अंजाम या चित्रपटात त्यांनी साकारलेली पोलिस वॉर्डनची भूमिका तर चांगलीच गाजली होती. राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील परदेसी हे प्रसिद्ध गाणे त्यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. या गाण्यातील त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स आज देखील लोक विसरलेले नाहीत. या चित्रपटानंतर कल्पना हम साथ साथ है या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटात रिमा लागूच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आपल्याला कल्पना यांना पाहायला मिळाले होते. पण या चित्रपटानंतर त्या अभिनयक्षेत्रापासून दूर गेल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी आपला देश देखील सोडला. कल्पना अय्यर या आज साठ वर्षांहून अधिक असल्या तरी त्यांनी लग्न केलेले नाही. त्यांनी लग्न न करण्यामागे एक खास कारण आहे. अमजद खान यांचे अभिनेत्री कल्पना अय्यर यांच्यावर प्रचंड प्रेम होते. कल्पना आणि अमजद यांच्यात वयाचे अंतर होते. पण तरीही त्या दोघांनी त्या गोष्टीचा कधीही विचार केला नाही. अमजद आणि कल्पनाची ओळख एका स्टुडिओत झाली होती. ते दोघे एकाच स्टुडिओत वेगवेगळ्या चित्रपटांचे चित्रीकरण करत होते. पण कल्पना आणि अमजद यांची पहिल्याच भेटीत चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कल्पना आणि अमजद यांच्या नात्याबद्दल काहीच दिवसांत मीडियात देखील बातम्या येऊ लागल्या होत्या. पण अमजद यांचे लग्न झालेले होते. त्यांना तीन मुलेदेखील होती. आपल्यामुळे अमजद यांच्या आयुष्यात वादळ निर्माण होऊ नये म्हणून कल्पना यांनी त्यांच्यासोबत लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण अखेरपर्यंत ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स राहिले. अमजद यांच्या मृत्युनंतरदेखील त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी कल्पना गेल्या होत्या. पण कल्पना यांनी आजवर कोणाशीही लग्न केले नाही. आज त्या दुबईत राहातात. त्या तिथे एक रेस्टॉरंट चालवतात. त्यांचा आणि चित्रपटसृष्टीचा आज काहीही संबंध नाहीये.