Join us  

जस्टिन ट्रूडो उत्तर द्या...! आता कंगना राणौत थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर बरसली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 12:18 PM

जस्टिन ट्रूडो, कृपया याचे उत्तर द्या, अशा आशयाचे ट्वीट कंगनाने केले आहे.

ठळक मुद्देकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी अलीकडे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रावरून सुरु झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली होती.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत चित्रपटांपेक्षा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राजकीय व धार्मिक मुद्यांवर बिनधास्त बोलणाºया कंगनाने आता थेट फ्रान्समध्ये झालेल्या घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्यावर कंगनाने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनाही लक्ष्य केले आहे. जस्टिन ट्रूडो, कृपया याचे उत्तर द्या, अशा आशयाचे ट्वीट तिने केले आहे.

‘प्रिय जस्टिन, आपण एका आदर्श जगात राहत नाही. लोकांनी असे वागायचे नको. पण अनेकदा लोक आपल्या मर्यादा लांघतात, ड्रग्ज घेतात, दुस-यांचे शोषण करतात, भावना दुखावतात. प्रत्येक छोट्या गुन्ह्याची शिक्षा शिरच्छेद असेल तर मग आपल्याला पंतप्रधान वा कोणत्याही कायद्याची काय गरज आहे?’, असा सवाल कंगनाने जस्टिन ट्रूडो यांना केला आहे.

तिने पुढे लिहिले, ‘कोणीही राम, कृष्ण, दुर्गा किंवा मग अल्लाह, ईसा मसीहाचे व्यंगचित्र बनवले तर प्रत्येकाला शिक्षा मिळायला हवे. वर्कप्लेस वा सोशल मीडियावर असे करणा-यांना रोखले गेले पाहिजे.’

काय म्हणाले होते ट्रूडोकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी अलीकडे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रावरून सुरु झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली होती. फ्रान्सच्या शार्ली हेब्दो मॅगझिनमध्ये मोहम्मद पैगंगर यांचे व्यंगचित्र छापून आल्यानंतर या देशात वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धडा शिकवताना एका शिक्षकाने चार्ली हेब्दोमध्ये प्रकाशित झालेल्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवले होते. त्यानंतर एका कट्टरपंथीय मुस्लिम युवकाने त्या शिक्षकाची हत्या केली. या घटनेनंतर फ्रान्समध्ये जोरदार कारवाई सुरू करण्यात आली. कट्टरवादी संघटना, संस्था सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आल्या. या घटनेची दखल फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनीदेखील घेतली होती. इस्लाम या एका धमार्मुळे फक्त फ्रान्सच नव्हे तर संपूर्ण जगात संकट निर्माण झाले असल्याचे वक्तव्य मॅक्रॉन यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर जस्टिन ट्रूडो यांनी मत व्यक्त केले होते. ‘आपणा सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पण हा अधिकार अमर्यादीत नाही. कोणालाही कुठेही आग लावण्याचा अधिकार नाही. आपल्याला दुस-यांचा सन्मान करत काम करायला हवे. ज्यांच्यासोबत आपण या समाजात, या पृथ्वीवर राहतो, त्यांना अनावश्यक इजा पोहोचवायला नको. प्रत्येक अधिकाराला मर्यादा असतात,’ असे ट्रूडो म्हणाले होते. 

टॅग्स :कंगना राणौत