Join us  

वाह रे 'न्यूटन'! भारतीय निवडणूक आयोगानं राजकुमार राववर सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 1:45 PM

अभिनेता राजकुमार रावची 26 ऑक्टोबर 2023 रोजी नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार राववर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राजकुमार रावची  26 ऑक्टोबर 2023 रोजी  नॅशनल आयकॉन  म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. राजकुमार राव लवकरच लोकांना मतदानाचे आवाहन करताना दिसणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

 

राजकुमार रावच्या ‘न्यूटन’ चित्रपटात  नक्षलग्रस्त भागातील निवडणूक परिस्थिती दाखवण्यात आली आहे. राजकुमार रावने या चित्रपटात प्रामाणिक निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. आता खऱ्या आयुष्यात तो मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे.  

भारतातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्याचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होतील. गुरुवारी यासंदर्भात औपचारिक समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितलं. शिवाय, पुढच्या वर्षी 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राजकुमार रावचा कसा उपयोग करुन घेते, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

निवडणूक आयोग विविध क्षेत्रातील नामवंतांना आपला 'नॅशनल आयकॉन' म्हणून जाहीर करत आहे. याआधी सचिन तेंडुलकर, अभिनेते पंकज त्रिपाठी यांनाही नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता दिली होती. त्याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, एमएस धोनी, आणिर खान आणि मेरी कोम यासारख्या दिग्गजांना नॅशनल आयकॉन केले होते. अधिकाअधिक मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे हा यामागचा उद्देश असतो. 

राजकुमार राव हा चित्रपटसृष्टीत अष्टपैलू अभिनेता, वैचारिक अभिनेता, नव विचारी अभिनेता या नावांनी ओळखला जातो. मानवी विचार आणि भारतीय सामाजिक जाणीव या बद्दल सखोल विचार करून तो त्याचं काम सर्वोत्तम करतोय.  एक अभिनेता म्हणून त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत. राजकुमार रावने त्याच्या दमदार कामगिरीसह २०२३ मध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत. काही खास पुरस्कारांनी सन्मानित झाल्यानंतर बी-टाउनच्या शेपशिफ्टरने GQ मोस्ट इंफ्लुशियल यंग इंडियन्स अवॉर्ड पटकावला. अशा प्रतिष्ठित विजयांसह चाहत्यांनी आता अभिनेत्याला 'राजकुमार वाह' असे संबोधण्यास सुरुवात केली आहे.

 

 

टॅग्स :राज कुमारबॉलिवूडसेलिब्रिटीभारतीय निवडणूक आयोग