Join us

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चा पहिला व्हिडीओ आला समोर, हुबेहूब मनमोहनसिंग यांच्याप्रमाणे चालताना दिसले अनुपम खेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 21:10 IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळावर आधारित ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाची एक व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. ...

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळावर आधारित ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाची एक व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. नऊ सेकंदाच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये अभिनेते अनुपम खेर आपल्या निवासाबाहेर येताना दिसतात. या चित्रपटात अनुपम खेर डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका साकारताना बघावयास मिळत आहेत. व्हिडीओमध्ये अनुपम यांची चालण्याची स्टाइल हुबेहूब मनमोहनसिंग यांच्यासारखी आहे. अनुपम त्यांचे दोन्ही हाथ समोर ठेवून खास डॉ. मनमोहनसिंग यांच्या अंदाजात चालताना दिसत आहेत. ते ज्या निवासाबाहेर येताना दिसत आहेत, त्या निवासाच्या गेटवर सुरक्षारक्षक तैनात आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, हे दृश्य पंतप्रधानांच्या निवासामध्ये चित्रित करण्यात आले. न्यूज एजन्सी एएनआयनेदेखील हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे. ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट मनमोहनसिंग यांचे पूर्व मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे. अनुपम यांनी काही दिवसांपूर्वीच एका वक्तव्यात म्हटले होते की, ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’  या चित्रपटात डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारखी समकालीन व्यक्तिमत्त्व असलेली भूमिका साकारण्याची संधी माझ्यासारख्या कलाकारास मिळणे खरोखरच आव्हानात्मक आहे. ते २४ तास मीडियाचा भाग बनले आहेत. त्यामुळे संपूर्ण जग त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून आहेत. त्यांनी म्हटले की, ‘मी गेल्या काही महिन्यांपासून या पात्रामध्ये पूर्णपणे समाविष्ट झालो आहे. आता मी ते पडद्यावर साकारण्याची प्रतीक्षा करीत आहे.  दरम्यान, हा चित्रपट नवोदित चित्रपट निर्माता विजय रत्नाकर गुट्टे हे दिग्दर्शित करीत आहेत. त्याचबरोबर हंसल मेहता या चित्रपटाचे रचनात्मक निर्माता आहेत. चित्रपटात अक्षय खन्ना संजय बारूची भूमिका साकारत आहे. बोहरा ब्रोस द्वारा निर्मित या चित्रपटाची स्क्रिप्ट मयंक तिवारी यांनी लिहिली आहे. हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. दुसरीकडे माजी कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भूमिका जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नेट साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे. सुजैन गेल्या काही काळापासून भारतात वास्तव्य करीत असून, तिने अनेक चित्रपटांबरोबरच मालिकांमध्येही काम केले आहे.