Join us  

OMG! कमबॅक अभिषेक बच्चनचे पण चर्चा विकी कौशलची!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 8:27 PM

सध्या विकी कौशल ‘मनमर्जियां’मुळे चर्चेत आहे. कालचं या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि विकी पुन्हा प्रकाशझोतात आला.

राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटात रणबीर कपूरनंतर सर्वाधिक कुणाच्या अभिनयाचे कौतुक झाले असेल तर तो विकी कौशल आहे. होय,‘संजू’तील विकीच्या अभिनय कौशल्याची चांगलीच प्रशंसा झाली. ‘संजू’आधी आलेल्या ‘राजी’ या चित्रपटातही विकी कौशल भाव खावून गेला. हेच कारण आहे की, आज विकी कौशलचे नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे. जे अभिनेते पडद्यावरील भूमिकेच्या लांबीसाठी नाही तर वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिकांसाठी आणि लोकांची शाब्बासकी मिळवण्यासाठी काम करतात, अशांच्या यादीत आता विकी कौशलचे नाव सामील झाले आहे. सध्या विकी कौशल ‘मनमर्जियां’मुळे चर्चेत आहे. कालचं या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि विकी पुन्हा प्रकाशझोतात आला. खरे तर हा चित्रपट अभिषेक बच्चनचा कमबॅक चित्रपट आहे. ‘हाऊसफुल3’नंतर अभिषेक पहिल्यांदा हा चित्रपट करतोय. सुमारे चार वर्षांनंतरचा हा कमबॅक सिनेमा अभिषेकसाठी बराच महत्त्वाचा आहे. पण ‘मनमर्जियां’चा ट्रेलर लॉन्च झाला आणि अभिषेक मागे पडला. होय, कारण विकी कौशल त्याच्यावर भारी पडला. ट्रेलरमध्ये विकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा फंकी लूक, त्याचा दिलफेक अंदाज, त्याची अदाकरी सगळ्यांनाच भावली.

 ‘मनमर्जियां’ हा एक प्रेम त्रिकोण आहे. विकी कौशल, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन या त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत. पण या तिन्ही बाजूंत विकी सर्वाधिक उठून दिसत आहे. अभिषेकच्या तुलनेत तो उजवा ठरलाय. तसेही विकी कौशलसाठी हे वर्ष यशाचे वर्ष ठरले. ‘मसान’सारखा नॉन कमिर्शिअल सिनेमा करणारा हा अभिनेता दोन वर्षांत मोठमोठ्या व्यावसायिक चित्रपटांतून नावारूपास येईल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. पण विकीने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले. ‘मनमर्जियां’ विकीच्या करिअरला आणखी एक पुढे पाऊल पुढे नेणारा चित्रपट ठरेल का, हे चित्रपटाच्या रिलीजनंतरचं कळेल. पण विकी अभिषेकवर भारी पडणार, हे मात्र स्पष्ट झाले आहे. अभिषेकसाठी नक्कीच ही ‘धोक्याची घंटा’ आहे.

 

 

टॅग्स :अभिषेक बच्चन