Join us  

अभय देओलने उडवली स्वत:च स्वत:ची खिल्ली, शेअर केले मजेशीर Meme

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:54 PM

अभयला फिल्म इंडस्ट्रीत १४ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण आताश: तो  फार कमी चित्रपटात दिसतो. अभय जितका उत्तम अभिनेता आहे, तितकाच उत्तम त्याचा सेन्स ऑफ ह्युमर आहे.

ठळक मुद्दे२००५ मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभयने डेब्यू केला होता.

अभिनयाची उत्तम जाण असूनही बॉलिवूडमध्ये फार कमी चित्रपटात दिसणारा एक अभिनेता म्हणजे अभय देओल. अभयला फिल्म इंडस्ट्रीत १४ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पण आताश: तो  फार कमी चित्रपटात दिसतो. अभय जितका उत्तम अभिनेता आहे, तितकाच उत्तम त्याचा सेन्स ऑफ ह्युमर आहे. गुरुवारी त्याचा प्रत्यय आला. यावेळी अभय स्वत: स्वत:ची खिल्ली उडवताना दिसला. आपल्या बॉलिवूड करिअरवरचे एक मजेदार मीम त्याने शेअर केले.यात एकीकडे अभय देओलचा फोटो आहे. या फोटोच्या वर ‘अभय’ असे लिहिलेले आहे. तर दुस-या बाजुला ‘Ab-nahi-hay’ असे लिहिलेले आहे. याचा अर्थ अभय आता बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. एका युजरने हे मीम पोस्ट केले.

या युजरची क्रिएटीव्हिटी पाहून अभय हे मीम शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. या फोटोला कॅप्शन देताना अभयने लिहिले आहे की, ‘हे मला ऑनलाईन मिळाले. तू बिग स्क्रिनवर फार का दिसत नाहीत? असा फॅन्स आणि प्रेस नेहमीच मला विचारतात. हा एक मोठा प्रश्न आहे. याचे शॉर्ट उत्तर देता येणार नाही. कदाचित एक दिवस मी यावर पुस्तक लिहिल. पण मी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, अशी तुमची इच्छा असेल तर मी सांगू इच्छितो की, माझ्याकडे सध्या तीन चित्रपट आहेत. जे पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहेत. लवकरच आणखी दोन चित्रपटांवर काम सुुरू करतोय’.

अलीकडे मिड डेला दिलेल्या मुलाखतीत अभय करिअरवर बोलला होता. होय,  मला कुणीच काम देत नाही. मी ज्याप्रकारचे सिनेमे केलेत, तसे चित्रपट सध्या कुणीही बनवत नाही. खरे तर मी स्वत:ला कुठल्याही एका चौकटीत बांधून ठेवलेले नाही. एखादी गोष्ट मला आवडली तर मी ती करतो. चित्रपटांबद्दल माझी स्वत:ची एक आवड आहे. मला ज्याप्रकारच्या कथा आवडतात, त्या बहुतेक नव्या दिग्दर्शकाच्या असतात. मला आजपर्यंत ना कुठला पुरस्कार मिळाला, ना कुठला लँडमार्क प्रोजेक्ट. त्यामुळे सेलिब्रेट करण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. तुम्ही मेनस्ट्रिम इंडस्ट्रीच्या विरूद्ध जात असाल तर तुम्हाला मनासारखे काम मिळत नाही, असे अभयने यावेळी सांगितले होते.

२००५ मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभयने डेब्यू केला होता. या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात अभयच्या अपोझिट आयशा टाकिया होती. यातील अभयचा अभिनय लोकांना आवडला होता. यानंतर आहिस्ता-आहिस्ता, हनीमून ट्रॅव्हल्स प्राय.लिमिटेड, एक चालीस की लास्ट लोकल, देव डी, आयशा, जिंदगी ना मिलेगी दोबारा, शंघाई, हॅपी फिर भाग जाएगी, नानू की जानू अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले. लवकरच तो चॉपस्टिक या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. अभय हा  धर्मेन्द्र यांचा भाऊ अजीत देओल यांचा मुलगा आहे.

टॅग्स :अभय देओल