Join us  

सगळं अगदी सहजं घडलं...! अशी मिळाली मुनिराची भूमिका, अमृतानं सांगितला ‘राजी’चा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:30 AM

‘राजी’ला 3 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृता खानविलकरने एक व्हिडीओ शेअर करत, एक भन्नाट किस्सा चाहत्यांशी शेअर केला आहे.

ठळक मुद्देराजी हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट हिने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. 

मराठीसोबतच हिंदी सिनेमातही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ‘राजी’ (Raazi) या गाजलेल्या सिनेमात अमृता झळकली आणि तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. पण ही भूमिका अमृताला कशी मिळाली? तर आता खुद्द अमृताने या प्रश्नाचे उत्तर दिलेय. सोबत एक भन्नाट किस्साही शेअर केला आहे. (3 years of Raazi)

‘राजी’ला 3 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृताने एक व्हिडीओ शेअर करत, हा किस्सा चाहत्यांशी शेअर केला आहे.राजी हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट हिने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. या सिनेमात अमृताने मुनिरा ही पाकिस्तानी व्यक्तिरेखा साकारली होती. ऊर्दू भाषेतील तिचे संवाद ऐकून सगळेच अवाक् झाले होते.

आणि मुनिराची भूमिका मिळाली...

अमृताने पोस्टमध्ये लिहिलेय, ‘ 2015 मध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ हा सिनेमा रिलीज झाला आणि या चित्रपटानंतर तब्बल दोन वर्ष माझ्याकडे काही काम नव्हतं... अगदी काहीही नाही, 2017 मध्ये मी आणि हिमांशू (अमृताचा पती) कुठेतरी प्रवास करून मुंबईत परतत होतो. आम्ही विमानतळावर होतो. अचानक हिमांशूने अगदी सहजपणे मला एक सल्ला दिला. अमू, तू पूर्वी काम केलेल्या कास्टिंग डायरेक्टर्सना फोन का करत नाहीस? कदाचित यातून काहीतरी चांगले घडेल, असे तो मला म्हणाला. मी काय केले तर अगदी विमानतळावरूनच जोगी सरांना फोन लावला. त्यांच्यासोबत मी अनेक वर्षांपूर्वी काम केले होते. जोगी सरांनी एकाच रिंगमध्ये माझा फोन उचलला आणि मला दुस-याच दिवशी भेटायला बोलावले. दुस-या दिवशी मी त्यांच्या आॅफिसमध्ये पोहोचले आणि त्यांनी माझ्या हातात थेट एक स्क्रिप्टच ठेवली. मी ती वाचली. संवाद ऊर्दू भाषेत होते. सर काफी ऊर्दू है, असे मी त्यांना म्हणाले. यावर डोन्ट वरी, हो जाएगा, एवढेच ते मला बोलले. दोनच दिवसांत मला त्यांचा पुन्हा फोन आला तो ‘धर्मा’च्या आॅफिसमध्ये जा असे सांगण्यासाठी. तिथे मला मेघना गुलझार भेटणार होत्या. मी धर्माच्या आॅफिसमध्ये पोहचले. काहीवेळाने मेघना यांच्यासोबत माझी भेट झाली त्यांनी माझे आॅडिशन आवडल्याचे सांगितले. पण, भूमिका पाकिस्तानी मुस्लिम व्याक्तिरेखीची असल्यामुळे मला उर्दू भाषेवर काम आहे, असेही त्यांनी मला सांगितले. मी तयारी दर्शवली आणि क्षणार्धात त्यांनी माझे अभिनंदन केले. मला कळेना. तुम्हाला माझी दुसरी आॅडिशन नको? असे मी मेघना यांना आश्चर्याने विचारले. यावर नाही, तुझे या चित्रपटाच्या प्रवासात स्वागत आहे, असे त्या हसत हसत मला म्हणाल्या आणि माझा ‘मुनिरा’ म्हणून प्रवास सुरु झाला. सगळे किती सहज घडले होते. कदाचित काही गोष्टी फक्त तुमच्यासाठीच बनल्या असतात...‘राजी’त काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा होता. मी सर्वांचे आभार मानते...

टॅग्स :अमृता खानविलकरराझी सिनेमा