Join us  

आशा पारेख यांच्यासोबतचा शॉट संपला अन् शत्रुघ्न सिन्हा ओरडले, डेटॉल ला... डेटॉल...; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 8:00 AM

पडद्यामागच्या वैराची कहाणी...; शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि आशा पारेख (Asha Parekh) या दोघांतील वैर म्हणजे, बॉलिवूडचं एक गाजलेलं वैर.

सिनेइंडस्ट्रीत  कोल्ड वॉर नवे नाहीत. पडद्यावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे कलाकार पडद्यामागे एकमेकांच्या चेहऱ्याकडेही पाहत नाहीत, हे इथलं वास्तव आहे. हे आजचं नाही तर पूर्वापार चालत आलंय. बॉलिवूडमध्ये विशेषत: अभिनेत्रींच्या कोल्ड वॉरची चर्चा होतं. पण हिरो-हिरोईनमध्येही वैर असू शकतं. आज आम्ही अशीच पडद्यामागच्या वैराची कहाणी तुम्हाला सांगणार आहोत. होय, शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि आशा पारेख (Asha Parekh) या दोघांतील वैर म्हणजे, बॉलिवूडचं एक गाजलेलं वैर.शत्रुघ्न सिन्हा तसेही फटकळ स्वभावासाठी ओळखले जातात. शत्रुघ्न फिल्म इंडस्ट्रीत नवखे असतानाही त्यांचा हा स्वभाव तसाच होता. पहिल्यावहिल्या ‘साजन’ या चित्रपटाच्या सेटवर आशा पारेख यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता.

मोहन सहगल यांनी 1969 मध्ये बनलेल्या ‘साजन’मध्ये शत्रुघ्न सिन्हांना ब्रेक दिला होता. आशा पारेख व मनोज कुमार यात लीड रोलमध्ये होते. आशा पारेख यांची त्यावेळी चलती होती. या सिनेमाच्या सेटवर आशा यांनी शत्रुघ्न सिन्हाबद्दल काहीतरी टिप्पणी केली आणि शत्रुघ्न सिन्हांचा संताप अनावर झाला. नंतर हे प्रकरण इतकं टोकाला गेलं की, दोघांनी अनेक वर्ष एकमेकांशी बोलणं टाकलं होतं. पुढची चार वर्ष आशा पारेख व शत्रुघ्न सिन्हा ही नावं पुन्हा एकत्र दिसली नाहीत. मात्र ‘हिरा’ या सिनेमासाठी दोघंही इच्छा नसतानाही एकत्र आलीत. दिग्दर्शक सुलतान यांनी विलनच्या रोलसाठी शत्रुघ्न यांना साईन केलं होतं. तर सुनील दत्त व आशा पारेख या चित्रपटात लीड रोलमध्ये होते. चित्रपटात आशा व शत्रुघ्न यांचे काही एकत्र शॉट्सही होते. दोघेही शॉट्स द्यायचे आणि एकमेकांशी एक शब्दही न बोलता आपआपल्या जागेवर बसायचे.

या चित्रपटाच्या ‘आज नाचूं ऐसे के आग लग जाए’ या गाण्यात आशा पारेख शत्रुघ्न यांच्या हाताला स्पर्श करतात असा एक शॉट होता. तो झाला आणि शत्रुघ्न ‘डेटॉल ला... डेटॉल’ असं जोरजोरात ओरडू लागले. कुणाला काहीही कळेना. पण आशा पारेख समजायचं ते समजल्या होत्या. न बोलता शत्रुघ्न यांनी आपला राग व्यक्त केला होता.आता या वैराचा अंत झाला की नाही, तर झाला. पुढे आपलं वागणं अगदीच बालीश होतं, याची शत्रुघ्न सिन्हा यांना झाली. तोपर्यंत आशा पारेख यांच्या मनातील रागही निवळला होता.

टॅग्स :शत्रुघ्न सिन्हाआशा पारेखबॉलिवूड