Yami Gautam:यामी गौतम (Yami Gautam) हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जाहिरातीतून प्रसिद्धीझोतात आलेल्या या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमध्येही तिने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. पण, एक वेळ अशी होती जेव्हा अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. यामागे नक्की काय कारण होतं? जाणून घ्या.
नुकतीच यामी गौतमने रणवीर अलाहबादियाच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासावर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान यामी म्हणाली, "माझ्या आयुष्यात मी एका वेळी माझे चित्रपट चालेले नाही तर इंडस्ट्री सोडून जाईन असा निर्णय घेतला होता. तेव्हा हिमाचल प्रदेशमध्ये मुळगावी जाऊन शेती करायची असं मी ठरवलं होतं."
पुढे अभिनेत्रीने म्हणाली की, "तेव्हा मी माझ्या आईला स्पष्टपणे सांगितलं होतं की जर माझे चित्रपट चालले नाही तर मी घरी परत येईन. आज माझं काम आणि अभिनय या दोन्ही गोष्टींमुळे मी आनंदी आहे. पण, एक वेळ असते जेव्हा काळ आपली परीक्षा घेत असतो. त्यामुळे तुम्हाला सातत्याने लोकांना पटवून द्यायला लागतं की, मी एक उत्तम कलाकार आहे. मला त्यावेळेस लोकांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मुळात ही गोष्ट वाईट नाही पण, माझ्यासारखे काही लोकांना असं करण्यात सुरक्षित वाटत नाही. त्यासाठी तुम्हाला एखाद्या पार्टीमध्ये जाणं गरजेचं आहे का? तर नाही. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी योग्य वाटत असतील तर तुम्ही ते करा. मी कोणालाही जज करणार नाही." असं यामीने सांगितलं.
अभिनेत्री यामी गौतमच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, 'विकी डोनर' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'टोटल सियाप्पा', 'अॅक्शन जॅक्सन', 'सनम रे' ,'उरी: द सर्जिकल स्ट्राइक','दसवीं', 'लॉस्ट', 'चोर निकल के भागा', 'OMG 2', 'आर्टिकल 370' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.