Join us  

सोनू निगमने रिजेक्ट केलेल्या जुबिन नौटियालचं एआर रेहमानमुळे बदललं आयुष्य, दिला होता हा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 12:09 PM

Jubin Nautiyal Birthday: एका रिअ‍ॅलिटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला, याच शोमध्ये रिजेक्ट झालेला आणि पुढे तरूणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या जुबिनची स्ट्रगल स्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे.

Jubin Nautiyal Birthday: कबीर सिंग, मरजावां आणि बजरंगी भाईजान यासारख्या चित्रपटांतील  गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याचा आज वाढदिवस. 14 जून 1989 रोजी डेहराडून येथे जुबिनचा जन्म झाला. एका रिअ‍ॅलिटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला, याच शोमध्ये रिजेक्ट झालेला आणि पुढे तरूणाईच्या गळ्यातील ताईत झालेल्या जुबिनची स्ट्रगल स्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे.

जुबिनचे वडील राम शरण नौटियाल एक शासकीय अधिकारी असण्यासोबतच एक बिझनेसमॅनही आहे. तर आई नीना एक बिझनेस वुमन आहे. नौटियाल कुटुंब उद्योगधंद्यात असताना जुबिनने मात्र संगीतात करिअर करायचं ठरवलं. लहानपणीचं त्याने संगीताचे धडे गिरवायला सुरूवात केली होती. वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत जुबिन त्याच्या शहराचा स्टार झाला होता. शहरातील अनेक लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तो गायचा, चॅरिटीसाठी परफॉर्म करायचा. जुबिनने एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये नशीब आजमवाण्याचा निर्णय घेतला. ऐकून आश्चर्य वाटेल पण ‘एक्स फॅक्टर इंडिया’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जुबिन रिजेक्ट झाला होता.

‘एक्स फॅक्टर इंडिया’मध्ये सोनू निगमने केलं होतं रिजेक्ट2011 साली जुबिन  ‘एक्स फॅक्टर इंडिया’ या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. हा शो तो जिंकू शकला नव्हता. विशेष म्हणजे शोचा जज सोनू निगमने ऑडिशन राऊंडमध्ये जुबिनला रिजेक्ट केलं होतं. ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. सोनू निगम, श्रेया घोषाल व संजय लीला भन्साळी या शोचे जज होते. जुबिनने ऑडिशन राऊंडमध्ये मोहित चौहानने गायलेलं ‘तुझे भुला दिया’ हे गाणं गायलं होतं. 

 जुबिनचे आॅडिशन राऊंडमधील हे गाणं ऐकून सोनू प्रचंड निराश झाला होता. इतका की त्याने जुबिनला थेट रिजेक्ट केलं होतं. अर्थात श्रेया घोषाल व संजय लीला भन्साळी यांचं मत मात्र वेगळं होतं. जुबिनमध्ये प्रतिभा आहे आणि त्याला एक संधी दिली जायला हवी, असं श्रेया व भन्साळींचे मत होतं.  सोनूला मात्र हे मान्य नव्हतं. तरीही श्रेया व भन्साळींची दोन मतं मिळाल्यानं जुबिन पुढच्या राऊंडमध्ये गेला होता. पुढे काही एपिसोडनंतर तो एलिमिनेट झाला. अर्थात तो खचला नव्हताच.  

तो अनेक म्युझिक डायरेक्टरला भेटला. ए.आर. रहेमान यांनी जुबिनला आणखी रियाज करण्याचा सल्ला दिला. जुबिननं तेच केलं. तो मुंबईतून घरी परतला आणि 3 वर्ष त्याने आपल्या गायकीवर अफाट मेहनत घेतली. सोनूने ऑडिशन राऊंडमध्येच रिजेक्ट केलेला जुबिन आज बॉलिवूडवर राज्य करतोय. बॉलिवूडचा तरूण पिढीचा सर्वाधिक आवडता सिंगर म्हणून तो ओळखला जातो.

2014 मध्ये  जुबिनने ‘सोनाली केबल’ साठी पहिलं गाणं गायलं आणि यानंतर कधीच मागे वळून बघितलं नाही. अलीकडे आलेल्या ‘कबीर सिंग’ या सिनेमातील ‘तुझे कितना चाहें और हम’ या जुबिनने गायलेल्या गाण्यानं तर कमाल केली. हे गाणं तुफान लोकप्रिय झालं जुबिनने तामिळ, तेलगू, कन्नड व बंगाली सिनेमांसाठीही अनेक गाणी गायली आहेत. 

 

 

 

टॅग्स :सोनू निगमए. आर. रहमान