Join us  

अन् निम्मी यांनी लट्टू झालेल्या हॉलिवूड अभिनेत्याला असे काही सुनावले की सगळेच थक्क झालेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 8:00 AM

वाचा, ‘अनकिस्ड गर्ल’चा गाजलेला किस्सा

ठळक मुद्देबरसात, दीदार, आन, उडन खटोला आणि बसंत बहार यांसारख्या चित्रपटांत काम करुन निम्मी यांनी अपार लोकप्रियता मिळवली. पण एका चुकीमुळे त्यांचे करिअर संपुष्टात आले.

आन,बरसात, दीदार, उडनखटोला अशा सिनेमात काम करणारी आणि 50 व 60 च्या दशकातील ही अभिनेत्री आज आपल्यात नाही. पण तिच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. आज निम्मी यांना आठवण्याचे कारण म्हणजे, आज (18 फेब्रुवारी) त्यांचा वाढदिवस. तेव्हा जाणून घेऊ या, त्यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी...

‘आन’ची शान...

होय, निम्मी यांचा ‘आन’ सिनेमा 1952 साली प्रदर्शित झाला. हा सिनेमा देशातील पहिला टेक्नीकलर सिनेमा होता. पहिला रंगीत सिनेमा पाहण्यासाठी लोक आतूर होते आणि ‘आन’ पाहण्यासाठी काहीही करायला तयार होते. अगदी चित्रपटगृहांसमोर तिकिटाच्या अ‍ॅडव्हसन्स बुकिंगसाठी स्वत:च्या खाटा मांडून प्रतीक्षा करत होते. महबूब खान लंडनमध्ये हा सर्वात महागडा रंगीत सिनेमा बनवण्यासाठी गेले होते. ‘आन’वर पैसा लावणा-या निर्मात्यांनी जेव्हा रिलीजआधी हा सिनेमा बघितला तेव्हा त्यांनी ‘हे काय?’ असा एकच सवाल मेहबूब खान यांना केला होता. कारण होते निम्मी. इतक्या सुंदर अभिनेत्री चित्रपटात इतक्या लवकर मारून टाकले? असा निर्मात्यांचा प्रश्न केला.  निर्मात्यांच्या दबावामुळेच  ऐनवेळी एक ड्रिम सीक्वेंन्स टाकून निम्मी यांची भूमिका वाढवण्यात आली होती.

हॉलिवूड अभिनेता असा काही फिदा झाला की...

निम्मी यांच्याबद्दलचा एक गाजलेला किस्सा आहे. हॉलिवूड अभिनेता एरोल फ्लिन निम्मी यांना पाहून अक्षरश: वेडा झाला होता. ‘आन’चे लंडन व अमेरिकेत ‘द सेवेज प्रिंसेस’ नावाने प्रीमिअर झालेत. लंडनच्या प्रीमिअरला एरोल हजर होता. निम्मी यांना पाहून तो असा काही फिदा झाला की, निम्मी यांना भेटायला पोहोचला. निम्मी समोर दिसताच त्याने पाश्चात्य पद्धतीने त्यांचा हात हातात घेत चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. पण निम्मी यांनी लगेच हात मागे घेतला. माफ करा, मी एक भारतीय मुलगी आहे, मी हे सहन करणार नाही, असे निम्मी यांनी एरोलला तोंडावर सुनावले. हा किस्सा त्यावेळी खूप गाजला होता. वृत्तपत्रांनी निम्मी यांना ‘अनकिस्ड गर्ल’ म्हटले होते.

निम्मीच हवी...60 च्या दशकात निम्मी यशाच्या शिखरावर होत्या. राज कपूर, अशोक कुमार, धर्मेन्द्र असे अनेक स्टार्स त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सूक असत. राज कपूर तर एका चित्रपटात निम्मीच हवी म्हणून अडून बसले होते.

अन् चूक भोवली..

बरसात, दीदार, आन, उडन खटोला आणि बसंत बहार यांसारख्या चित्रपटांत काम करुन निम्मी यांनी अपार लोकप्रियता मिळवली. पण एका चुकीमुळे त्यांचे करिअर संपुष्टात आले.  होय, 1963 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरे महबूब’ या चित्रपटात निम्मी यांना लीड हिरोईनचा रोल ऑफर झाला होता. दिग्दर्शक हरमन सिंह रवैल यांनी निम्मी यांना चित्रपटात लीड रोल दिला होता. पण निम्मी यांनी लीड रोलऐवजी सेकंड लीड रोल हवा म्हणून अडून बसल्या.  लीड रोल सोडून त्यांनी  राजेंद्र कुमार यांच्या बहीणीची भूमिका स्वीकारली. निम्मींच्या या हट्टापुढे दिग्दर्शकानेही हार मानली आणि सेकंड लीड रोल निम्मी यांना देऊन लीड रोलसाठी साधनाला साईन केले. चित्रपट रिलीज झाला आणि सगळेच उलटे झाले. या चित्रपटाने साधनाला स्टार बनवले आणि निम्मी यांच्या करिअरला ओहोटी लागली. यानंतर निम्मी यांना दुय्यम रोल ऑफर होऊ लागलेत.

 

टॅग्स :निम्मी