Join us  

बापूच्या लीला मोठ्या पडद्यावर; आसारामवर चित्रपट येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 2:45 PM

सुनील बोहरा करणार चित्रपटाची निर्मिती

नवी दिल्ली: बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचं पीक आलेलं पाहायला मिळत आहे. अनेक अभिनेते, नेते आणि खेळाडूंवर बायोपिक आले आहेत. यानंतर आता एका नव्या बायोपिकची जोरदार चर्चा आहे. बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरचे निर्माते सुनील बोहरा आसारामच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. हा चित्रपट सुशील मजुमदार यांच्या 'गॉड ऑफ सिन: द कल्ट, द क्लाऊट अँड डाऊनफॉल ऑफ आसाराम बापू' पुस्तकावर आधारित असेल, अशी चर्चा आहे. बोहरा यांनी गेल्याच महिन्यात चित्रपट निर्मितीचे हक्क खरेदी केले आहेत. आसारामच्या उदयापासून 2013 मध्ये त्याच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपापर्यंतची कहाणी पुस्तकात आहे. आपण आसारामच्या आयुष्यावरील पुस्तक वाचल्याचं सुनील बोहरा म्हणाले. याशिवाय आसारामवर आरोप करणाऱ्या पीडित मुलींचा खटला मोफत लढणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या पी. सी. सोळंकी यांच्याबद्दल वाचूनही आपण प्रभावित झाल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाशी संबंधित सूरत आणि जोधपूरमधल्या दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांमुळे आपल्याला चित्रपट निर्मितीची प्रेरणा मिळाल्याचं बोहरांनी म्हटलं. हा चित्रपट याच रियल हिरोंवर आधारित असेल, अशी माहिती त्यांनी दिली.  

टॅग्स :आसाराम बापूआत्मचरित्र