Join us  

नागराज मंजुळेंच्या हिंदी सिनेमात बिग बी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2017 12:03 PM

मुंबई, दि. 7- सैराट सिनेमाच्या प्रचंड यशानंतर आता दिग्दर्शक नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ...

मुंबई, दि. 7- सैराट सिनेमाच्या प्रचंड यशानंतर आता दिग्दर्शक नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हिंदी सिनेमात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमात बिग बी खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.त्यामुळे या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढते आहे..

'सैराट'च्या यशानंतर नागराज मंजुळे पुन्हा एकदा एखादा मराठी सिनेमा बनवतील असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं सांगत नागराज मंजुळे यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे नागराज मंजुळे यांचे आवडते अभिनेते आहेत. त्यामुळेच नागराज मंजुळे यांनी पहिला हिंदी सिनेमा अमिताभ बच्चन यांच्यासोबत करणार असल्याचं समजतं आहे.

नागराज मंजुळे यांचा हा हिंदी सिनेमा सामाजिक विषयावरचाच असणार आहे. या सिनेमाच्या पटकथेवर त्यांनी गेल्या दीड वर्षापासून काम सुरू केलं होतं. त्यांनी या सिनेमाची पटकथा अमिताभ यांना ऐकवली आणि त्यानंतर बिग बींनी होकार दिल्याचं बोललं जात आहे. अमिताभ बच्चन यांनी 'सैराट' पाहिलेला होता. त्यामुळे नागराज मंजुळे यांनी हिंदी सिनेमाची चांगली पटकथा समोर ठेवल्याने अमिताभ बच्चन यांनी सिनेमात काम करण्यास लगेच होकार दिल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. पण या सिनेमाचा विषय आणि नाव हे अजूनही गुलदस्त्यात असल्याने या नव्या सिनेमाबाबतची उत्सूकता वाढली आहे. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीत सगळेच रेकॉर्ड तोडले होते. सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला. सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे हा सिनेमाचा तेलुगु आणि पंजाबी भाषेतही रिमेक केला जातो आहे. तसंच दिग्दर्शक करण जोहर सैराट सिनेमा हिंदी भाषेतही घेऊन येतो आहे. या नव्या हिंदी सिनेमाच्या स्क्रिप्टवर नागराज मंजुळे यांनी दीड वर्ष काम केलं आहे. अमिताभ बच्चनचा मी मोठा फॅन असल्याचं नागराज मंजुळे यांनी सांगितलं होतं. सैराट सिनेमा पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नागराज मंजुळे यांचं कौतुकही केलं होतं. तसंच नागराज मंजुळे यांना सिनेमा पाहिल्यानंतर पत्रही पाठविलं होतं.