Join us  

Bhuvan Bam: सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनानं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 8:25 PM

कोरोनानं अनेक घरंच्या घरं उध्वस्त केली आहेत. त्यात आता सुप्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम याच्या आई आणि वडिलांचं कोरोनानं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनानं अनेक घरंच्या घरं उध्वस्त केली आहेत. त्यात आता सुप्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम याच्या आई आणि वडिलांचं कोरोनानं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भुवन बाम यानं स्वत: काही वेळापूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. भुवन बाम यानं एक भावूक पोस्ट शेअर केली असून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. 

नोव्हेंबर २०२० मध्ये भुवन याला स्वत:ला कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी त्याच्यावर घरातच उपचार सुरू होते. खुद्द भुवन यानंच त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती शेअर केली होती. त्यानंतर तो घरातच क्वारंटाइन असल्याचं त्यानं सांगितलं होतं. पण त्याच्या आई-वडिलांची काही वर्षापासूनच तब्येत ठिक नव्हती. त्यांच्यावरही उपचार सुरू होते. 

भुवन गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून खूप दूर होता. या काळात तो आई-वडिलांची काळजी घेत होता. आई आणि वडील दोघंही आता या जगात न राहिल्यानं भुवनला मोठा धक्का बसला आहे. त्यानं सोशल मीडियात एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. "मी माझ्या दोन्ही लाइफलाइन कोरोनामुळे गमावल्या आहेत. आई आणि वडिलांच्या नसण्यानं आता आयुष्यात काहीच पूर्वीसारखं नसेल. एका महिन्यात सारंकाही उध्वस्त झालंय. घर, स्वप्न सारंकाही उध्वस्त झालं. आई, बाबा आता माझ्यासोबत नाहीत. आता शून्यातून जगण्याला पुन्हा सुरुवात करावी लागेल. पण मन तयार होत नाही", अशी भावूक पोस्ट भुवननं शेअर केलीय. यात त्यानं आपल्या आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर केलाय. 

"मी एक उत्तम मुलगा ठरलो का? त्यांना वाचविण्यासाठी मी कमी पडलो का? असे प्रश्न आता आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. ते पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ शकतील का? मी आशा करतो की ते दिवस लवकरच येतील", असंही भुवननं म्हटलं आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यायु ट्यूब