मुंबई : भोजपुरी सिनेमाचा सुपरसटार आणि लॉलीपॉप लागेलू या गाण्याचा गायक पवन सिंह पुन्हा एकदा वादात सापडला आहे. काही दिवसांपासून पवन सिंह त्याच्या लग्नामुळे चर्चेत होता. आता त्याने सह कलाकार आणि भोजपुरी सिनेमातील टॉपची अभिनेत्री अक्षरा सिंहला मारहाण केलीये. पवन सिंहने ज्यावेळी मारहाण केली तेव्हा तो दारुच्या नशेत होता.
पत्रकार आणि भोजपुरी सिनेमाचे पीआर शशिकांत सिंह यांनी फेसबुक पोस्ट लिहून याची माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवन सिंह याने दारुच्या नशेत अक्षरा सिंहला सिलवासा येथील एका हॉटेलमध्ये बेदम मारहाण केली. हे प्रकरण इतकं वाढलं की, हॉटेलचा एक कर्मचारी अक्षराला वाचवण्यासाठी पुढे आला. असेही सांगितले जात आहे की, त्याच्यासमोरच पवनने अक्षराचे केस पकडून तिचं डोकं भिंतीवर आदळलं. असे सांगितले जात आहे की, यात अभिनेत्री चांगलीच जखमी झालीये.
अक्षरा आणि पवन सिलवसा येथे एका सिनेमाचं शूटिंग करत होते. याप्रकरणी दोघांकडून काहीही अधिकृत खुलासा करण्यात आला नाहीये. पण या दोघांच्या अफेरच्या नेहमीच चर्चा होत होत्या. आता या घटनेने दोघांच्याही नात्याला नवे वळण मिळाले आहे.
कोण आहे पवन सिंह?
पवन सिंह याने करिअरची सुरुवात एका अल्बमने केली होती. त्यानंतर त्याच्या `लॉलीपॉप लागेलू' या गाण्याने सगळीकडेच धमाका केला. नंतर काही सिनेमांमध्येही त्याने काम केलं. पवन सिंह याने नुकतच दुसरं लग्न केलंय. त्याच्या पहिल्या पत्नीने लग्नाच्या काही दिवसातच आत्महत्या केली होती.