Join us  

भारतबाला यांच्या ‘लॉकडाऊन’ चित्रफितीचे आज प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 6:06 AM

मराठी आवृत्तीही उपलब्ध होणार : अकेले नही, सब मिलके एकसाथ ‘उठेंगे हम...’

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘या देशातले एकशे तीसकोटी लोक एक दिवस अचानक दाराआड कोंडले गेले, ही त्यालोकांची आणि स्तब्ध होऊन गेलेल्या सुन्न देशाची कहाणी आहे. पण यातूनही हा देश बाहेर पडेल... हा देश नव्हे, तुम्ही-आम्ही-आपण सगळे-एकमेकांच्या मदतीने यातून बाहेर पडू...’, लॉकडाऊनमध्ये अजूनही अडकून पडलेले भारतबालामुंबईच्या त्यांच्या घरून ‘लोकमत’शी बोलत होते. आज (शनिवारी) ‘उठेंगे हम’ या शीर्षकाची भारतबाला प्रॉडक्शनची नवी चित्रफीत रिलीज होते आहे.एरवी भारतबाला म्हटले की उत्कृष्ट निसर्गदृश्ये, मान्यवरांचा सहभाग आणि सुमधूर संगीताने सजलेल्या भारतीयांच्या स्मरणात सदैव रेंगालणाऱ्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ सारख्या आठवणी! पण ‘उठेंगे हम’ आहे मुक्या देशाची अस्वस्थ दृश्य-कहाणी!‘मै चाहता हूं, की जो हुआ, हम कभी ना भुले’- या चिवट ध्यासातून भारतबाला यांनी कोरोनाशी युद्ध ऐन भरात आलेले असताना देशभरात ड्रोन चित्रीकरणासाठी परवानगी मिळवण्याचे दिव्य अंगावर घेतले आणि काही भल्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पारही पाडले. ‘मैने सब यहां, मुंबई में बैठेबैठे किया’- ते सांगतात. त्यांचा शूटिंग क्रू देशात वेगवेगळ््या ठिकाणी आपापले काम करत होता, आणि हा माणूस मुंबईत घर बैठेबैठे स्मार्टफोनवरून दिग्दर्शन करत होता.अखेर हाती जमलेल्या शंभराहून अधिक तासांच्या चित्रीकरणातले काही क्षण निवडून ‘उठेंगे हम’ आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ही चित्रफीत अनेक भारतीय भाषांमध्ये डब करण्यात आली असून मराठी आवृत्तीसाठी सोनाली कुलकर्णी हिने आपला आवाज दिला आहे.कोरोनाने आपल्या अर्थव्यवस्थेची आणि मानसिक स्वास्थ्याची जी काही दैना उडवली आहे, त्यातून आपण सगळे बाहेर पडू आणि एकमेकांना हात देऊन बाहेर पडू; अशी भारतबाला यांची कळकळ आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘अभी देश में दर्द बहोत है! लेकिन दर्दसेही हौसला बढता है, जिम्मेदारी आती है!’