Join us  

सहीच! भरत जाधव पुन्हा रंगभूमीवर झळकणार, 'अस्तित्व' नाटकातून मांडणार चाळीतल्या कुटुंबाची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 2:12 PM

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट आहे.

'सही रे सही' या नाटकाकून नाट्यरसिकांच्या मनात कायमचं घर करणारे अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav) आता नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं 'अस्तित्व' असं नाटकाचं शीर्षक आहे. मुंबईतील चाळीत राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट आहे. अभिनेत्री चिन्मयी सुमित या भरत जाधव यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. येत्या ३ नोव्हेंबरपासून नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. 

भरत जाधव यांचा मोठा चाहतावर्ग आहे. 'सही रे सही','श्रीमंत दामोदर पंत','ऑल द बेस्ट','आमच्यासारखे आम्हीच' अशा अनेक नाटकांतून त्यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. तसंच अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तरी भरत जाधव यांना रंगभूमीवर पाहण्याची मजा काही औरच असते. 'अस्तित्व'या नाटकातून नाट्यरसिकांना ती पर्वणीच मिळाली आहे. 

ही एक चाळीतल्या कुटुंबाची कथा आहे.  जे  आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. कुटुंबातील एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकरची ही कथा आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत. त्यामुळे आता त्यांची ही धडपड यशस्वी होणार का? याचे उत्तर आपल्याला येत्या काळात मिळणार आहे. 

चाळीत राहणं म्हणजे १० बाय १० च्या खोलीत सात ते आठ लोकं राहतात. अशा परिस्थितीत भांडणं, अॅडजस्ट करणं हे येतंच. भरत जाधव यांनी याआधी याच विषयावर आधारित 'लालबाग परळ' सिनेमात काम केलं होतं.

नाटकाबद्दल दिग्दर्शक स्वप्नील जाधव म्हणतात, "सर्वसामान्यांना भावणारी आणि हृदयाला स्पर्श करणारी ही कथा आहे. आपण नेहमीच सगळ्यांकडून कळत नकळत अपेक्षा ठेवत असतो. या अपेक्षांसोबत मेळ साधताना कुठेतरी आपण आपले अस्तित्व हरवून बसतो. अशा वेळी हे नाटक प्रत्येकाला नक्कीच सकारात्मक मार्ग दाखवणारे ठरेल. या अपेक्षांच्या गर्तेत गुरफटलेल्या अस्तित्वाचा शोध घेणारे हे नाटक, नाट्यगृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडेल. आपल्याच घरात किंवा आपल्या आजूबाजूला घडणारी ही कथा आहे, त्यामुळे प्रेक्षक या नाटकाशी समरूप होतील. एवढं नक्की की हे भावनिक नाटक कुटुंबाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यास मदत करेल."

या नाटकाच्या निमित्ताने सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. साई पियुष यांचे या नाटकाला संगीत लाभले असून सरीता भरत जाधव या नाटकाच्या निर्माती आहेत.

टॅग्स :भरत जाधवनाटकमराठी अभिनेता