Join us

"बाहुबली"मधील भल्लालदेवचा एक डोळा दृष्टिहीन

By admin | Updated: April 30, 2017 18:45 IST

"बाहुबली"मधील भल्लालदेव ही नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबातीच्या अभिनयाचीही प्रशंसा केली जात आहे. पण

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा "बाहुबली - 2" जेव्हापासून मोठ्या पडद्यावर झळकला आहे तेव्हापासून संपूर्ण देशभरात या सिनेमाचीच चर्चा सुरू आहे. या सिनेमामुळे केवळ दिग्दर्शक एस.एस. राजमौली आणि बाहुबलीची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास नक्कीच सुपरस्टार झाले आहेत.
 
मात्र "बाहुबली"मधील भल्लालदेव ही नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबातीच्या अभिनयाचीही तेवढीच प्रशंसा केली जात आहे. 
 
मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का?, मोठ्या पडद्यावर "वजनदार" भूमिका साकारणारा राणाला त्याच्या डाव्या डोळ्याने पूर्णतः दिसत नाही. "लहानपणी कुणीतरी मला डावा डोळा दान तर केला, मात्र शस्त्रक्रियेनंतरही त्या डोळ्यामध्ये दृष्टी येऊ शकली नाही", असे खुद्द राणाने सांगितले.
 
राणाने एका कार्यक्रमादरम्यान ही गोष्ट सांगितली. या कार्यक्रमादरम्यान राणा म्हणाला की, "तुम्हाला एक गोष्ट सांगू का?. मी माझ्या डाव्या डोळ्याने पाहू शकत नाही. मला केवळ उजव्या डोळ्याने दिसते.  हा डावा डोळा जो तुम्ही पाहत आहात तो माझा नसून कुण्या दुस-या व्यक्तीचा आहे. हा डोळा मला संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर दान करण्यात आला. मी माझा उजवा डोळा बंद केला तर मी काहीही पाहू शकत नाही". 
 
"जर एखाद्याला डोळ्यांनी पाहता येत नसेल तर त्यांनी स्वतःचं आयुष्य कोणत्याही प्रकारच्या भीतीत व्यतित करू नये", असा सल्लाही यावेळी राणाने जनतेला दिला.  "बाहुबली -2" सिनेमा रिलीज झाल्यानंतर राणा केवळ देशभरातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध झाला आहे. 
 
 
दरम्यान, दिग्दर्शक एसएस राजामौली आणि प्रभास यांच्या बहुप्रतिक्षित "बाहुबली 2" सिनेमाने पहिल्याच दिवसापासून रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली आहे. रिलीज होण्याआधीच 500 कोटींची कमाई करणा-या सिनेमाची लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. भारतात 6500 आणि जगभरातील किमान 9000 स्किन्सवर रिलीज झालेल्या  "बाहुबली 2" पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. बॉक्स ऑफिस रिपोर्ट आणि मिळालेल्या माहितीनुसार बाहुबलीने अत्यंत सहजपणे 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्याच दिवशी 100 कोटींची तुफानी कमाई करणारा बाहुबली भारतीय सिनेसृष्टीतील पहिला सिनेमा ठरला आहे. 
 
"बाहुबली 2"च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा 115 ते 120 कोटीपर्यंत असल्याची माहिती आहे. सिनेमाने केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईमध्ये इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काही नसून हे अपेक्षितच होतं, असे समीक्षक सांगत आहेत.  
सिनेमा समीक्षक तरण आदर्श यांनीही ट्विट करत  "बाहुबली 2" रेकॉर्डतोड कमाई करणारा सिनेमा असल्याचं सांगितलं होते.