Join us

कडू दुधीरसामुळे 'भावोजी' आदेश बांदेकर यांना बाधा

By admin | Updated: December 25, 2015 09:29 IST

कडू दुधीरस प्यायल्याने महाराष्ट्रातील तमाम वहिन्यांचे ‘भावोजी’ म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांना विषबाधा झाली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - प्रकृती ठणठणीत रहावी यासाठी आजकाल अनेकजण फळभाज्यांचे रस सेवन करतात, त्यापैकी दुधीचा रसही औषधी व गुणकारी समजला जातो. मात्र हाच दुधीचा रस महाराष्ट्रातील तमाम वहिन्यांचे ‘भावोजी’ म्हणून ओळखल्या जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांच्या अक्षरश: जीवावर बेतला होता. कडू दुधीरस प्यायल्याने आदेश बांदेकर यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. मात्र वेळीच रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आल्याने ते थोडक्यात वाचले.
गेल्या शुक्रवारी (१८ डिसेंबर) चित्रीकरणासाठी कर्जतला जाण्यापूर्वी आदेश यांनी ग्लासभर दुधीरस घेतला. मात्र थोड्याच वेळात त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला, उलट्या व जुलाब होऊ लागले आणि प्रचंड घामही आला. या सर्व प्रकारामुऴे आदेश यांची पत्नी व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर खूप घाबरल्या व त्यांनी आदेश यांना तत्काळ पवईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना आयसीयुमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले व चार -पाच दिवसांनी त्यांची प्रकृती सुधारली, गुरूवारी त्यांना घरी पाठवण्यात आले. 
कडू दुधीचा रस प्याल्यामुळे आदेश यांची त्यांची प्रकृती बिघडल्याचे निदान डॉक्टरांनी केले. कडू दुधीचे सेवन जीवावर बेतू शकते. या रसामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. मात्र वेळीच उपचार झाल्यामुळे सुदैवाने आदेश बांदेकर बचावले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जावून त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूसही केली.
आता माझी प्रकृती उत्तम आहे, पण तो दिवस खूप भयानक होता. डॉक्टरांची मेहनत व सर्वांच्या आशीर्वादमुळे मी बचावलो, असे आदेश यांनी सांगितले. आपण  लवकरच होम मिनिस्टरच्या शुटींगसाठी बाहेर पडू, असेही ते म्हणाले.