Join us

मराठी सिनेमालाही स्वातंत्र्य चळवळीचे आकर्षण

By admin | Updated: August 16, 2015 03:04 IST

‘निळकंठ मास्तर’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील स्वातंत्र्यलढ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली. मराठी चित्रपटसृष्टीला स्वातंत्र्यलढ्याचे कायमच आकर्षण राहिले आहे.

‘निळकंठ मास्तर’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील स्वातंत्र्यलढ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली. मराठी चित्रपटसृष्टीला स्वातंत्र्यलढ्याचे कायमच आकर्षण राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्याचे संदर्भ येण्याबरोबरच थेट भारावलेला काळही रुपेरी पडद्यावर चितारला गेला आहे. स्वातंत्र्य चळवळ, क्रांतिकारकांचा त्याग आणि बलिदान याचे मराठी सिनेमाला नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळे ठरावीक अंतराने स्वातंत्र्य चळवळीचे चित्रण करणारे मराठी चित्रपट येत असतात. क्रांतिकारकांच्या कहाण्यांना मराठी चित्रपटांनी आकर्षक पद्धतीने रंगविले आहे. मराठी नाटक आणि सिनेमाचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. इंग्रजांची राजवट असतानाही नाटक-चित्रपटांच्या माध्यमातून अन्याय उघड करण्याचे प्रयत्न झाले. ‘किचकवध’ या नाटकात तर संवाद अशा पद्धतीने होते, की जणू किचकाच्या रूपाने इंग्रजांवरच प्रहार केला जात आहे. क्रांतिकारकांचे आयुष्य रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी आयुष्य पणाला लावले. यामध्ये सर्वात पहिले नाव येते ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे. ‘वीर सावरकर’ या चित्रपटाचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते प्रत्यक्षातही आणले. यासाठी वैयक्तिक आर्थिक झळही सोसली. वीर सावरकरांचे देशप्रेम, त्यांचे अफाट साहस आणि त्यांच्यातील कवी या चित्रपटातून समोर आला. लोकवर्गणीच्या माध्यमातून बनलेला हा जगातील कदाचित पहिला चित्रपट असेल. यासाठी बाबूजींनी अनेक कार्यक्रम केले. स्वत:ची बिदागीही चित्रपटासाठी वापरली. तब्बल आठ वर्षे या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. २०१२मध्ये ‘वीर सावरकर’ गुजराती भाषेतही आला आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रीमियरला उपस्थित होते. चाफेकर बंधूंच्या अतुलनीय धैर्याची कहाणी मांडणारा ‘२२ जून १८९७’ हा चित्रपट. यातील ‘गोंद्या आला रे’ ही आरोळी आजही फेमस आहे. पुण्यामध्ये प्लेगच्या साथीच्या काळात इंग्रज अधिकारी रॅँड याने अनेक जुलूम केले. चाफेकर बंधूंनी गणेश खिंडीमध्ये रॅँडचा खून केला. यामध्ये लोकमान्य टिळक यांचीही व्यक्तिरेखा होती आणि ती सदाशिव अमरापूरकर यांनी साकारली होती. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून नचिकेत आणि जयू पटवर्धन यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. यातील बहुतांश कलाकार हे थिएटर अ‍ॅकॅडमीशी संबंधित होते. ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ या चित्रपटात लोकमान्य टिळकांचा जीवनप्रवास चितारला होता. सुबोध भावे यांनी केलेली लोकमान्यांची भूमिका हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरले. नाना पाटेकर यांच्या भारदस्त आवाजात सूत्रधार असल्याने चित्रपटाला वेगळी उंची प्राप्त झाली होती. प्रिया बापट, चिन्मय मांडलेकर, समीर विद्वंस यांच्याही या चित्रपटात भूमिका होत्या. ‘वासुदेव बळवंत फडके’ हा चित्रपटही ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे स्वप्न होते. अजिंक्य देव यांनी यातील वासुदेव बळवंत फडके यांची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. फडके यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा लढा उभारला. त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठविण्यात आले. मात्र, तेथील तरुंगातूनही ते धाडसाने निघाले, ही कथा यामध्ये मांडण्यात आली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केले. चित्रपटातील भव्य दृश्ये हे त्याचे एक आकर्षण होते. या चित्रपटातील १८व्या शतकातील काळ उभा करण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले होते. रमेश देव आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही विशेष भूमिका होत्या.