ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4- बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता वरुण धवन लवकरच एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यश राजच्या सिनेमातून हे दोघे रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत अनुष्का आणि वरुण ‘सुई धागा’ या सिनेमातून एकत्र काम करताना दिसणार आहेत. यशराज फिल्म्सची निर्मिती असणाऱ्या या सिनेमाचं संपूर्ण नाव ‘सुई धागा- मेड इन इंडिया’ असं आहे. याबद्दलची माहिती यशराज फिल्म्सने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून दिली आहे.
दिग्दर्शक शरत कटारिया या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. याआधी त्यांनी आयुषमान खुराणा आणि भूमी पेडणेकर स्टारर ‘दम लगा के हैशा’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. महात्मा गांधीजींपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींपर्यंत आपल्या नेत्यांनी ‘मेड इन इंडिया’ या घोषवाक्याचं नेहमीच समर्थन केलं आहे. ‘सुई धागा’च्या माधम्यातून त्यांचा हा संदेश लाखो लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचा मला अभिमान आहे, असं अभिनेता वरूण धवन म्हणाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक शरत कटारिया यांनी लिहिलेली सिनेमाची कथा मला आवडली. तसंच यशराज फिल्म्ससोबत काम करताना मला अतिशय आनंद होतो आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मी आणि अनुष्का पहिल्यांदाच काम करत आहोत, असंही वरूण म्हणाला आहे. ‘ज्या कथांशी लोक जोडलेली असतात अशा कथांवर काम करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते. सुई धागा प्रत्येक स्तरातील व्यक्तीशी जोडला गेलेला असल्याने नक्कीच प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल, असं अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणाली आहे. या सिनेमाच्या शूटिंगला पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सुरूवात होणार असून 2018मध्ये गांधी जयंतीच्या दिवशी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून एक नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेे. अभिनेता वरूण धवन सध्या जुडवा सिनेमाचा सिक्वेल असलेल्या "जुडवा 2" या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर अभिनेत्री अनुष्का शर्मा "जब हॅरी मेट सेजल" या तिच्या शाहरूख खानसोबतच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.