Join us  

'इंदू सरकार'साठी बॉलिवूडमधून पाठिंबा न मिळाल्याचं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 3:51 PM

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी 'इंदू सरकार' हा त्यांचा आगामी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना सिनेसृष्टीतील कलाकारांनी पाठिंबा न दिल्याचं दुःख व्यक्त केलं आहे

ठळक मुद्दे'इंदू सरकार'साठी बॉलिवूडमधून पाठिंबा न मिळाल्याचं दुःखसिनेमा वादात असताना बॉलिवूडने एकी दाखवायला हवी होती, असं मधूर भांडारकर यांचं मत आहे. इंदू सरकार हा सिनेमा १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर आहे.

मुंबई, दि. 26- राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी 'इंदू सरकार' हा त्यांचा आगामी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना सिनेसृष्टीतील कलाकारांनी पाठिंबा न दिल्याचं दुःख व्यक्त केलं आहे. सिनेमा वादात असताना बॉलिवूडने एकी दाखवायला हवी होती, असं मधूर भांडारकर यांचं मत आहे. इंदू सरकार हा सिनेमा १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या सिनेमात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने दोन कट्स सुचवत युए प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पण सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून तसंच राजकीय पक्षांकडून विरोध होत असताना दिग्दर्शक मधूर भांडारकर यांच्या बाजूने कोणी न बोलल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'उडता पंजाब' आणि 'ए दिल है मुश्किल' हे सिनेमे जेव्हा वादात सापडले होते तेव्हा मधूर भांडारकर त्या सिनेमांच्या समर्थनार्थ उभे राहिले होते. 

मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मधूर भांडारकर यांनी सिनेसृष्टीने पाठिंबा न दिल्याचं बोलून दाखवलं. सिनेसृष्टीने समर्थन न दिल्याचं दुःख वाटतं. एक सिनेदिग्दर्शक म्हणून मी नेहमीच सिनेसृष्टीच्या सोबत उभं राहिलो आहे. उडता पंजाब किंवा ए दिल है मुश्किल हे सिनेमे असूदेत किंवा इतर कुठलाही सिनेमा मी नेहमीच त्यांच्या बरोबर होतो. काही विशिष्ट ठिकाणीचं सक्रियता दाखविली जाते, याचा राग येतो. असं मधूर भांडारकर म्हणाले आहेत. 

आज जे माझ्याबरोबर झालं ते उद्या इतर कोणाबरोबरही होऊ शकतं. म्हणूनच आपल्या सोयीनुसार लोकांना समर्थन देणं योग्य नाही. सिनेमा वादात असताना कोणीही समर्थन दिलं नाही.याचं वाईट वाटत असल्याचं दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी सांगितलं आहे. तसंच नागपूर आणि पुण्यात सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.