बॉलिवूडमध्येही अनेक जण नशिबाला मानतात. त्याचे कारणही तसेच आहे. अनेक गोष्टी अगदी हाताशी आल्याचे जाणवते अन् दुसऱ्याच क्षणी ती हातून निघूनही जाते. बॉलिवूडमध्ये बंद पडलेल्या सुमारे 15 हजार चित्रपटांच्या बाबतीतही असेच घडले आहे. हे चित्रपट एक तर तयार झाले नाहीत किंवा त्यांना प्रदर्शित करण्यात आले नाही. यात एक नाव हमखास घेतले जाते. हे नाव आहे ‘कायर’. ‘कायर’ या नावाने कादर खान यांनी कथा लिहिली. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी या बाबत प्रकाश मेहरा यांना सांगितले. मेहरांना कादर खानचा हा प्रस्ताव आवडला. अमिताभ बच्चन यांना देखील ही कथा आवडली मात्र ते चित्रपटाच्या शूटिंगसाठी वेळ देऊ शकले नाही. कादर खान यांनी अमिताभची बरीच वाट पाहिली. अखेर कथा प्रकाश मेहरा यांना विकून या चित्रपटाशी आपला संबध तोडून टाकला. अनेक वर्षांनंतर प्रकाश मेहरा यांनी स्वत:च्या दिग्दर्शनात कायर चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा केली. यावेळी ‘कायर’साठी राजेश खन्ना, हेमा मालिनी, संजय दत्त व टीना मुनीम यांची निवड केली. या चित्रपटाच्या भव्य मुहूर्तही झाला. पण, शूटिंग सुरू होण्यापूर्वी राजेश खन्ना आजारी पडले अन् हा चित्रपट थांबला. प्रकाश मेहरा यांंनी पुन्हा प्रयत्न केला. यात जितेंद्र व अक्षय कुमार यांनी भूमिका करावी, अशी त्यांची इच्छा होती. अक्षय कुमारसाठी ही मोठी संधी होती. मात्र यावेळी प्रकाश मेहरा स्वत:च आजारी पडले. कायरची शूटिंग रद्द झाली. नंतर अक्षय इतका व्यस्त झाला की त्याला वेळ देता आलाच नाही. प्रकाश मेहरा यांनी पुन्हा संधी घेतली. राजकुमार यांचा मुलगा ‘पुरू’च्या लॉचिंगसाठी ‘कायर’ची अधिकृत घोषणा करण्यात आली. कथा तयार झाल्यावर पहिल्या शेड्युलमधील पुरूचा अभिनय पाहून प्रकाश मेहरा यांनी ‘कायर’च्या जागी ‘बाल ब्रह्मचारी’ हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट प्रदर्शित झाला अन् बॉक्स आॅफिसवर तो फ्लॉप ठरला. अखेर मेहरांचे निधन झाले पण, कायरची निर्मिती होऊ शकली नाही.
...अन् ‘कायर’ कधी तयार झालाच नाही!
By admin | Updated: November 23, 2015 01:46 IST