Join us  

अमित ठाकरेंची 'ही' इच्छा अजून अपूर्ण, वडील राज ठाकरेंबाबत म्हणाले, 'त्यांनी माझं एक काम केलेलं नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 3:42 PM

अमित ठाकरेंनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भर कार्यक्रमात वडील राज ठाकरे यांच्यासंदर्भातील एक वक्तव्य केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे तरूण नेते अमित ठाकरे यांची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.  नुकतेच पार पडलेल्या 'झी युवा सन्मान पुरस्कार 2024' सोहळ्यात प्रयोगशील तरूणांना झी युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. विविध क्षेत्रांतील कर्तबगार तरूणांच्या यादीत अमित ठाकरे यांचाही गौरव करण्यात आला. यंदाच्या झी युवा नेतृत्व सन्मान पुरस्काराने अमित ठाकरेंचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुरस्कार सोहळ्यात अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडून असलेली एक इच्छा सांगितली. 

अमित ठाकरेंनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भर कार्यक्रमात वडील राज ठाकरे यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केलं. ते सध्या चर्चेत आहे. कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे म्हणाले, 'माझ्या वडिलांनी मला नेहमी प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. पण अजूनही त्यांनी माझ्यासाठी एक काम केलेलं नाही आणि ते म्हणजे मला एखादा कौतुकाचा मेसेज करणं. मी माझ्या वडिलांचा आदर करतो आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं पालन करतो. पण मला त्यांच्याकडून प्रोत्साहनाचा मेसेज मिळण्याची इच्छा आहे. कदाचित मी अजून कौतुक व्हाव असं काही काम केलं नसावं. मात्र तो दिवस लवकरच येईल आणि मी त्या दिवसाची वाट पाहीन', असं अमित ठाकरे म्हणाले.

येत्या रविवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार २०२४ हा सोहळा प्रसारीत होणार आहे. अमित ठाकरे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मनसेच्या विद्यार्थीसेनेच्या अध्यक्षपदापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. गेल्या काही वर्षा ते सक्रिय राजकारणात काम करताना दिसत आहेत. अमित ठाकरे यांच्या दौऱ्यांमध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा होत असते. कधी ते मुंबई लोकलने प्रवास करताना दिसले, तर कधी एखाद्या पदाधिकाऱ्याच्या घरी जेवताना दिसतात. ते समाजातील तळागाळातील लोकांच्या व्यथा समजून घेत त्यांची मदत करतात. 

टॅग्स :अमित ठाकरेसेलिब्रिटीराज ठाकरे