ब्लॅक अँड व्हाइट काळ गाजवणाऱ्या भगवान दादांचा ‘अलबेला’ चित्रपट आणि त्यातील सुपरहिट गाणी आजही अनेक जण गुणगुणताना दिसतात. नृत्याच्या अनोख्या शैलीसाठी ते खास ओळखले जातात. त्यांचा जीवनपट उलगडणारा ‘एक अलबेला’ चित्रपट लवकरच येत आहे, हे आपल्याला माहीतच आहे. यामध्ये मराठीतील अनेक कठीण भूमिका साकारलेला अभिनेता मंगेश देसाई भगवान दादांची प्रमुख भूमिका साकारत आहे. तर आपल्या अभिनयाने बॉलीवूड जगतातील उल्लाला गर्ल विद्या बालन या चित्रपटात गीता बालीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा टे्रलर नुकताच रिलीज झाला असून, भगवान दादांच्या चाहत्यांची आणि सर्वच प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कारण हा टिझर आपल्याला ब्लॅक अँड व्हाइट काळातील सुंदर विश्वात घेऊन जातो. मंगेश देसाई आणि विद्या बालन या दोघांच्या लूकवर घेतलेली मेहनत दिसून येते, कारण दोघंही हुबेहूब आपापल्या व्यक्तिरेखांसारखे दिसत आहेत. इतकेच नाही तर त्या दोघांनीही त्यांच्या अभिनयावर खूप काम केले असल्याचेही समजते. त्यामुळे आता चित्रपट कधी प्रदर्शित होतोय, याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा ऐकू येत आहे. चित्रपटाची कथा शेखर सरतांडेल यांनी लिहिली असून, शेखर सरतांडेल यांनी दिग्दर्शन केले आहे, तर मनीष बाबरे चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. विद्या बालन, मंगेश देसाईसोबतच स्वप्निल राजशेखर, विद्याधर जोशी, विघ्नेश जोशी आदी कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
‘एक अलबेला’चा ट्रेलर रिलीज
By admin | Updated: January 30, 2016 08:30 IST