ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूड गाजवणा-या ऐश्वर्या राय-बच्चन हिला आता मराठी इंडस्ट्रीचे वेध लागले आहेत. स्वतः ऐश्वर्यानेच याची कबुली दिली आहे. विक्रम फडणीस यांच्या पहिल्या ‘हृदयांतर’ या मराठी चित्रपटाच्या संगीत समारंभात ऐश्वर्याने ही कबुली दिली.
या कार्यक्रमात ऐश्वर्याला मराठी चित्रपटात काम करण्याविषयी विचारण्यात आले असता ‘मला मराठी चित्रपटात काम करायला आवडेल. मला खरोखरच तुमचे आभार मानावेसे वाटतात की, तुम्ही उपस्थित मीडियासमोर मला हा प्रश्न विचारला’, असं ती म्हणाली.
ऐश्वर्या राय-बच्चन हिने आपल्या करिअरमध्ये 30 पेक्षा जास्त हिंदी सिनेमे, आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. मराठी सिनेमामध्ये काम करून स्वतःच्या फिल्मी करिअरचा विस्तार करायचा आहे असं ऐश्वर्या म्हणाली. ‘मी एक कलाकार आहे, मी स्वत:च स्वत:साठी मार्ग तयार केला आहे. म्हणून चित्रपटांची निवड करताना मला कधीच अडचण आली नाही.’ त्यामुळे मी कुठल्या भाषेच्या चित्रपटात काम करायला हवे हे तेवढे महत्त्वाचे नाही, चांगली कथा असेल तर मला मराठी सिनेमात काम करायला नक्की आवडेल’, असं ऐश्वर्या म्हणाली.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याने ‘फन्ने खान’ हा चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अनिल कपूर झळकणार आहे. मात्र चित्रपटात ऐश्वर्या अनिलच्या अपोझिट असेल हे अद्यापपर्यंत निश्चित झाले नाही. ती चित्रपटात दुसरी अन् हटके भूमिका साकारू शकते, असेही बोलले जात आहे. ‘फन्ने खान’ हा एक कॉमेडी म्युझिकल चित्रपट आहे.