Join us  

माझा अगडबम चित्रपट पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार हे सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:03 PM

तब्बल आठ वर्षांनंतर अगडबम या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच माझा अगडबम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. माझा अगडबम हा चित्रपट पाहाणाऱ्या प्रेक्षकांसाठी तृप्तीने एक खूप छान सरप्राईज दिले आहे.

अगडबम या तृप्ती भोईरच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची कथा, चित्रपटात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान या गोष्टी प्रेक्षकांना चांगल्याच भावल्या होत्या. आता या चित्रपटाचा दुसरा भाग माझा अगडबम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अगडबम या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश मोतलिंग यांनी केले होते तर निर्मिती तृप्ती भोईरची होती. या चित्रपटात तिच्यासोबत मकरंद अनासपूरे, उषा नाडकर्णी यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट २०१० ला प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. तब्बल आठ वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच माझा अगडबम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 

माझा अगडबम या चित्रपटात देखील तृप्ती भोईर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुबोध भावे, उषा नाडकर्णी, तानाजी गालगुंडे, जयवंत वाडकर आणि कान्हा भावे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः तृप्ती भोईरने केले आहे. माझा अगडबम हा चित्रपट आज म्हणजेच २६ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. हा देखील चित्रपट प्रेक्षकांना तितकाच आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 

'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत या सिनेमाचे लिखाण आणि दिग्दर्शन तृप्ती भोईरचेच आहे. शिवाय टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीफळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. तसेच रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. 

माझा अगडबम हा चित्रपट पाहाणाऱ्या प्रेक्षकांसाठी तृप्तीने चित्रपटाच्या शेवटी एक खूप छान सरप्राईज दिले आहे. या चित्रपटाचा तिसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे चित्रपटाच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळते. या चित्रपटाचे नाव अगडबम ३ असणार आहे. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांना केव्हा पाहायला मिळणार, तसेच या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार याची उत्तरे आपल्याला काही दिवसांत मिळतील अशी आशा करायला हरकत नाही.

टॅग्स :माझा अगडबमसुबोध भावे