Join us  

१५ वर्षांनंतर ऑल द बेस्ट नाटक पुन्हा रंगभूमीवर दाखल, भरत, अंकुश आणि संजयची जागा घेणार हे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 2:06 PM

१९९३ मध्ये आलेली देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ (All The Best) ही एकांकिका जबरदस्त गाजली. त्यानंतर त्याचे व्यावसायिक नाटक करायचे ठरले. ३१ डिसेंबर १९९३ या दिवशी ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा व्यावसायिक रंगभूमीवर दाखल झाले.

१९९३ मध्ये आलेली देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ (All The Best) ही एकांकिका जबरदस्त गाजली. त्यानंतर त्याचे व्यावसायिक नाटक करायचे ठरले. ३१ डिसेंबर १९९३ या दिवशी ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा व्यावसायिक रंगभूमीवर दाखल झाले. पहिल्या संचातील कलाकारांसाठीही हे नाटक महत्त्वाचे ठरले. या नाटकाने शेकडो तगडे स्टार इंडस्ट्रीला दिलेच पण भरत जाधव (Bharat Jadhav), अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) हे सुपरस्टार सुद्धा दिले. आता हे नाटक नव्या कलाकारांसह १५ वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर दाखल होणार आहे. 'अनामय' नाट्यसंस्थेची निर्मिती असणाऱ्या या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग २ फेब्रुवारीपासून रंगणार आहे. 

मुका, बहिरा व आंधळा अशा मित्रांची कथा असलेलं हे धमाल नाटक प्रेक्षकांना खूप भावले. दर महिन्याला साठ ते सत्तर प्रयोग व्हायचे. नाटकाच्या पहिल्या पाच वर्षात तब्बल २१०० प्रयोग झाले. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल देशपांडे यांनी या नाटकाची प्रशंसा करत देवेंद्र पेम यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. 'ऑल द बेस्ट'ने केवळ मराठीचं नाही तर विविध भाषिक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावले. त्यामुळे हे नाटक आजवर १२ भाषांमध्ये प्रदर्शित झाले असून त्याचे जवळ जवळ १०००० प्रयोग झाले आहेत. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. ती लक्षात घेऊन हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे. नव्या दमाच्या मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील व रिचा अग्निहोत्री या कलाकारांनी नाटकाची जोरदार तालीम सुरु केली आहे.

 नाटकाचे लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम म्हणाले की, "या नाटकावर मराठी रसिकांनी अपार प्रेम केले आहे. त्यांना हे नाटक पुन्हा पाहायला निश्चित आवडेल. गेल्या १५-२० वर्षात आलेल्या नव्या पिढीला 'ऑल द बेस्ट' नाटकाचं नाव माहीत आहे. त्यांनाही हे विश्वविक्रमी नाटक पाहता यावं आणि या  नाटकाचा आस्वाद घेता यावा म्हणून आम्ही हे नाटक नवपिढीसाठी घेऊन येत आहोत". 

टॅग्स :भरत जाधवअंकुश चौधरीसंजय नार्वेकर