Join us  

अदनान सामीनं सोशल मीडियाला या कारणामुळे म्हटलं होतं 'अलविदा', लेटेस्ट पोस्टमधून झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 11:36 AM

Adnan Sami: गायक अदनान सामीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट डिलीट करून ‘अलविदा’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला होता.

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अदनान सामी(Adnan Sami)ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सर्व पोस्ट हटवून इन्स्टाग्रामला अलविदा केले होते, तेव्हापासून तो चर्चेत आला आहे. आता नुकतेच त्याचे पोस्ट हटवण्याचे कारण समोर आले आहे. आपल्या नवीन गाण्याच्या प्रमोशनसाठी त्याने हे सर्व केले. खरे तर अदनान सामी अलविदा हे नवीन गाणे रिलीज करणार आहे. याआधी, जेव्हा त्याने सर्व पोस्ट डिलीट केल्या होत्या आणि अलविदा असे म्हटले होते तेव्हापासून हे त्याचे नवीन गाणे असल्याचे चाहते तर्कवितर्क लावत होते. तसेच काही दिवसांपूर्वी अदनानने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

अदनान सामीने त्याच्या नवीन गाण्याचे मोशन टीझर त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले - माझा निरोप घेण्याची पद्धत. याशिवाय त्याने गाण्याची झलक असणारा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्याचे हे गाणे २८ जुलैला रिलीज होणार आहे. 

याआधी त्याने पाच सेकंदाचा मोशन व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये इंग्रजीत 'ALVIDA' लिहिलेले दिसले. तेव्हापासून 'अलविदा' हे अदनान सामीचे नवे गाणे, अल्बम किंवा प्रोजेक्ट असल्याचा अंदाज चाहते बांधत होते. इतकेच नाही तर काही लोकांनी सांगितले की, इंस्टाग्रामवरून सर्व पोस्ट हटवणे ही अदनानची प्रमोशनचा फंडा आहे.

काही दिवसांपूर्वी अदनान सामीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झाले. एकेकाळी त्याचे वजन २३० किलो होते. पण, हळूहळू त्याने वजन कमी केले. अदनान अनेक वर्षांपासून आपले वजन कमी करत आहे. वजन वाढल्याने त्याच्या गुडघ्यांवर ताण येऊ लागला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की जर त्याने वजन कमी केले नाही तर तो फक्त ६ महिनेच जगू शकेल. त्यानंतर त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अदनानने ११ महिन्यांत १६५ किलो वजन कमी केले.

वर्कफ्रंटबद्दल

अदनान सामी हा गायकसोबतच संगीतकार, म्युझिक कंपोझर आणि पियानो वादक आहे. तो हिंदी आणि दक्षिण चित्रपटांसाठी भारतीय आणि पाश्चात्य संगीत तयार करतो आणि गातो. संगीतविश्वातील योगदानाबद्दल त्याला देशातील सर्वोच्च पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. अदनानने 'भर दो झोली मेरी', 'तेरा चेहरा', 'भीगी भीगी रातों में', 'मेरी याद रखना', 'सुन जरा', 'तेरे बिना जिया जाये ना' आणि 'शायद यही तो प्यार है' ही गाणी गायली आहेत आणि ही गाणी खूप लोकप्रिय आहेत.

टॅग्स :अदनान सामी