Join us  

बाबो..! अभिनेत्री नूतन यांनी तनुजा यांना धडा शिकवण्यासाठी तब्बल १२ केळी लावली होती खायला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 6:19 PM

सुपर डान्सर सीझन ४मध्ये या आठवड्यात बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा हजेरी लावताना दिसणार आहेत.

सुपर डान्सर सीझन ४मध्ये या आठवड्यात बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा हजेरी लावणार आहेत. यावेळी या शोमधील सर्व छोटे स्पर्धक अभिनेत्री तनुजा यांच्या गाजलेल्या गाण्यांवर आपल्या शैलीत डान्स परफॉर्म करून तिला मानवंदना देणार आहेत. स्पर्धक अनीश तट्टीकोटा आणि त्याचा सुपर गुरु आकाश शेट्टी यांनी तनुजा यांच्या मेरे जीवन साथी चित्रपटातील ‘चला जाता हूँ’ गाण्यावर परफॉर्म करून सगळ्यांना थक्क करून सोडले. शिल्पा शेट्टी कुंद्राने दोघांचा हा परफॉर्मन्स खूप वाखाणला, विशेषतः सुपर गुरु आकाशचे तिने कौतुक केले. ती म्हणाली, “हा परफॉर्मन्स म्हणजे जणू मला मिळालेली भेटच होती. या परफॉर्मन्समध्ये अनीशची जादू काही आगळीच होती.” अनीशच्या ऊर्जेने सळसळणारा परफॉर्मन्स पाहून तनुजादेखील थक्क झाल्या होत्या. इतक्या लहान वयात तो ज्या सराईतपणे नाचतो हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले.

यावेळी अनीशच्या आईने तनुजा यांना तिच्या आणि नूतनच्या नात्याबद्दल विचारले. त्यावर तनुजा म्हणाल्या, “नूतन माझ्यापेक्षा साडेसात वर्षं मोठी होती. त्यामुळे आमच्यात कधीच भांडण झाले नाही. कारण ती मला माझ्या आईसारखी होती. मी घरातले शेंडेफळ होते. सगळे जण माझे लाड करत.” आपल्या बहिणीशी आपले नाते कसे होते हे सांगताना तनुजा यांनी एक किस्सा सांगितला की, नूतन एका चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना त्यांनी तनुजा यांना धडा शिकवण्यासाठी बारा केळी खायला लावली होती आणि खरं तर तनुजा यांना केळी जराही आवडत नसत. 

यावर पुस्ती जोडत त्या म्हणाल्या, “आम्ही वाद घालायचो, झगडायचो पण आमचे एकमेकींवर प्रेम होते. जसे सगळ्या भावंडांचे असते तसेच आमचे नाते होते. काजोल आणि तनिशाचे देखील असेच आहे. त्यांच्या वादावादी सतत चालू असतात आणि मला त्या त्यामध्ये हस्तक्षेप करू देत नाहीत, कारण त्यांच्या मते तो त्या दोघींचा प्रश्न आहे आणि त्या दोघी तो सोडवू शकतात.” 

टॅग्स :सुपर डान्सरनुतन